वर्धा : हिंगणघाट येथील निसर्गसाठी फाउंडेशन ही संस्था पक्षी, पशूबाबत सतर्क राहून कार्य करते. विदर्भातील सर्वात मोठी म्हणून येथील पक्षांची मिश्र विण वसाहत (हेरोनरी) प्रसिद्ध आहे. येथे ३२ झाडांवर २५९ घरटी असल्याची गणना झाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या येथील उप अभियंत्याने कार्यालय परिसरात असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या. त्यामुळे अनेक पक्षांची घरटी खाली पडली. त्यातील अंडी फुटली. ही संपदा नष्ट केली म्हणून निसर्ग साथीने हिंगणघाट पोलीस व वन विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्याची दखल घेत वन विभागाचे अधिकारी कुरवडे यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. यावर कारवाई करण्याची हमी त्यांनी दिल्याचे संस्थेने सांगितले. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार घरटी, पक्ष्यांची अंडी नष्ट करणे, पक्ष्यांना त्रास देणे, पक्षी अधिवासास बाधा निर्माण करणे, घरटी असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, याबाबी गुन्हा ठरतात. हा सर्वांसाठीच धडा ठरावा, असे मत प्रवीण कडू यांनी व्यक्त केले.