वर्धा : राष्ट्रीय काँग्रेस अद्याप घराणेशाहीचे स्तोम सोडायला तयार नाही, असे म्हणता येईल. सोबतच नव्या नेतृत्वास संधी देण्याची बाब पण भाषणपुरतीच शिल्लक, अशी स्थिती असल्याचे चित्र जिल्हा काँग्रेस समितीच्या पूर्णगठीत समितीबाबत म्हणावी लागेल.
आता हेच प्रदेश समितीने ओके करून पाठविलेल्या जिल्हा काँग्रेस समितीतून दिसते. झिया पटेल व अमर वऱ्हाडे हे जिल्हा प्रभारी कायम आहेत. विधानसभेत पराभूत रणजित कांबळे व शेखर शेंडे आहेतच. प्रदेश समितीवर रणजित कांबळे व त्यांच्या भगिनी चारूलता टोकस आणि अनंत मोहोड, अविनाश काकडे, सुधीर पांगुळ व धनराज फुसे. राष्ट्रीय समितीवर परत रणजित कांबळे व चारूलता टोकसच. तालुकाध्यक्ष म्हणून जुनेच कायम. पण गंमतीची बाब म्हणजे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करीत खासदार झालेले अमर काळे अद्याप जिल्हा काँग्रेसमध्ये अस्तित्व राखून आहेतच. आर्वीत राजेंद्र रत्नपारखी, आर्वी शहर दिलीप जाधव, आष्टीत रवींद्र गंजीवाले व कारंजा येथे टिकाराम चौधरी ही खासदार गटाची नेतेमंडळी अद्याप पदावर कायम आहेत.
प्रदेश प्रतिनिधी बाबत तसेच. खासदार अमर काळे यांच्या गटाचे म्हणून परिचित अरुण बाजारे व टिकाराम चौधरी हेच प्रदेश प्रतिनिधी आहेत. तालुकानिहाय प्रदेश समितीवर शेखर शेंडे, डॉ. शिरीष गोडे, सुनील बासु, रणजित कांबळे, मनोज वसू, अजय बाळसाराफ, रामकृष्ण खुजे व समुद्रपूर तालुक्यातून चारूलता टोकस यांना घेण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे व खासदार झालेले अमर काळे हेच आर्वी मतदारसंघात काँग्रेसीचे सर्वेसर्वा राहले. त्यामुळे दुसरा गटच तयार झाला नाही. विधानसभा निवडणुकीत पण त्यांनी पत्नीस राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी खेचली. मी म्हणजेच काँग्रेस अश्या भूमिकेत काळे राहल्याने अन्य नेतृत्व तयार झाले नाही. भाजप सोबतच त्यांनी पण काँग्रेसमुक्त आर्वी असा संकल्प तर सोडला नव्हता ना, असे गंमतीत म्हटल्या जाते.
जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर हे म्हणतात की पक्ष नवनिर्माण सूरू आहे. कोणावाचून पक्षाचे अडत नाही. पक्ष निरीक्षक येणार असल्याने सध्या कार्यकारिणीची स्थिती काय, हे स्पष्ट करण्यात आले. प्रदेश समितीने सुधीर पांगुळ व अन्य नव्याचा त्यात फक्त समावेश केला. आर्वी भागात मोहोड व अन्य नेते तयार आहेत. काही नवीन पण पक्ष प्रवेश करणार. रिकाम्या जागा भरून काढण्याइतपत आम्ही सक्षम आहोत, असे जिल्हाध्यक्ष चांदुरकर यांनी ठणकावून सांगितले.