वर्धा : लोकसभा निवडणुकीत वर्धा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमर काळे विजयी झालेत. राष्ट्रवादी शोधायचा कुठे, अशी स्थिती असताना काँग्रेसचा हा कधीकाळी बालेकिल्ला राहलेला मतदारसंघ पवारांच्या मांडीवर विसावला. काँग्रेस नेते बघतच राहले. मोर्शी वगळता वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट, धामणगाव या क्षेत्रात नवखी तुतारी जोरजोरात वाजली. नवे चिन्ह आडवे नं येवू देता विजय मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आनंदून गेले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचे आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. राज्यात काँग्रेस व अविभाजीत राष्ट्रवादी आघाडी करीत निवडणुका लढताना जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ नेहमी राष्ट्रवादीस आंदणात दिल्या सारखा मिळायचा. मात्र आता हिंगणघाट नव्हे तर आर्वी विधानसभा मतदारसंघ प्रथम प्राधान्य म्हणून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबईतून भेटीगाठी घेत परतलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने याचे सुतोवाच केले. मुख्य कारण म्हणजे खासदार अमर काळे यांचे हे क्षेत्र राहले. ते २००२, २००४ व २०१४ मध्ये येथील काँग्रेस आमदार राहले. आता ते राष्ट्रवादीत आले. पण आर्वीचा त्यांचा दावा कायम राहणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ मागतील व वरिष्ठ नेते पण त्यांच्यावर येथून आमदार निवडून आणण्याची जबाबदारी टाकतील. जिल्ह्यात चारपैकी तीन मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी मिळायची. आता आर्वी व हिंगणघाट असे दोन मतदारसंघ घ्यायचेच व वर्धेवर पण दावा करायचा, असे सूत्र वाटाघाटीवेळी ठेवण्याचे ठरल्याचे या नेत्याने नमूद केले. एक खासदार निवडून येताच राष्ट्रवादीने बाह्या सरसावल्याचे म्हटल्या जात आहे.
आर्वी मतदारसंघ मागून घेतानाच या ठिकाणी पत्नी मयुरा काळे यांना उभे करण्याचा मनसुबा अमर काळे यांचा असल्याची पक्षात चर्चा होते. काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीतर्फे लढण्यास तयार होताना हे क्षेत्र आपणच सांभाळणार, असे काळे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता आर्वीस सर्वोच्च प्राधान्य मिळणार, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. लोकसभा क्षेत्र गमावून बसणाऱ्या काँग्रेसवर आता आणखी एक विधानसभा क्षेत्र गमविण्याची वेळ येणार का, अशी चिंता काँग्रेस वर्तुळास लागली आहे. तर हिंगणघाट क्षेत्र पण राष्ट्रवादी लढणारच अशी खात्री सुधीर कोठारी, अतुल वांदिले, राजू तिमांडे या नेत्यांना आहे.