वर्धा : विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असल्याने विविध राजकीय पक्ष कामाला लागल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पण आता त्यात मागे नाही. मनोरंजनातून काँग्रेस पक्षाची विचारधारा व योजना पोहोचविण्याचा मार्ग एक लोकमान्य मार्ग असल्याचे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचाच हा उपक्रम आहे. त्यासाठी ब्लॉक स्तरावर कलापथक स्थापन करण्याचा निर्णय झाला.
पक्षाची विचारधारा प्रामुख्याने मतदारापर्यंत नेण्यासाठी हा उपक्रम असून राष्ट्रीय व राज्य पातळीवर पक्षप्रणित स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत राबविलेल्या योजणांची माहिती सोप्या व मनोरंजक पद्धतीने देण्याचा हेतू आहे. काँग्रेसचे सांस्कृतिक व लोक कलावंत असे दोन विभाग असून अत्यंत गुणी कलावंतांनी ते युक्त असल्याचे प्रदेश समितीचे म्हणणे आहे. त्यांचा येत्या विधानसभा तसेच त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होवू शकतो. प्रत्येक ब्लॉक स्तरावर असे कलापथक १५ ऑगस्टपर्यंत स्थापन करण्याची सूचना आहे. तशी जबाबदारी जिल्हाध्यक्षांची राहणार. सांस्कृतिक व लोककला विभागप्रमुखांना त्यासाठी बैठका घ्यायच्या आहेत. १५ ऑगस्टला पथकचे उद्घाटन करायचे आहे.
हेही वाचा – वैद्यकीय महाविद्यालय ! जागा निश्चिती अंतिम टप्प्यात, काय घडामोड ते वाचा
हेही वाचा – धक्कादायक! बच्चू कडू यांच्या मोर्चासाठी भंडाऱ्यातील शेकडो महिलांना फसवणूक करून नेले
ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर अश्या तीन महिन्यांच्या कार्यक्रमाची आखणी होणार. त्याची ३१ ऑगस्टपर्यंत प्रदेश समितीस माहिती द्यायची आहे. प्रथम मोठ्या गावी व त्यानंतर सर्व तालुक्यांतील गावांत कार्यक्रम घेण्याची सूचना आहे. प्रसिद्धी, वाहन व्यवस्था, स्थळाची व्यवस्था व इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष तसेच ब्लॉक अध्यक्षवर टाकण्यात आली आहे. विभागाच्या राज्य प्रमुखांनी या सर्व मोहिमेवर लक्ष ठेवून ती फत्ते करण्याची जबाबदारी पार पाडावी. कार्यक्रम व कलावंत सहभाग नियोजन त्यांनाच करायचे आहे. या राज्यस्तरीय प्रमुखांनी राज्यभर दौरे करावे. ब्लॉक पातळीवरील कार्यक्रम यशस्वी होत असल्याची खात्री करुण घ्यावी. त्याचा दरमहा अहवाल द्यावा, असेही निर्देश प्रदेश समितीतर्फे नाना गावंडे यांनी दिले आहेत. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या कला पथक उपक्रमाची नियोजनबद्ध आखणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच नागरिकांना मदत करण्यासाठी नागरिक मदत व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याची सूचना प्रदेश समितीने पक्षाच्या जिल्हा व ब्लॉक अध्यक्ष यांना केली आहे. अभ्यासू तरुणांनासोबत घेत हे केंद्र सुरू करायचे आहे.
© The Indian Express (P) Ltd