वर्धा : मातृभक्तीची उदाहरणे आता या काळात तशी दुर्मीळच. उलट आईवडीलास वृद्धाश्रमात सोडून देणारेच अधिक. म्हणून हे उदाहरण डोळ्यात पाणी आणणारेच ठरावे. आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा या गावातील मुलंच नव्हे दुसऱ्या घरातून काही दिवसांपूर्वीच सून म्हणून आलेल्या मुलीनेही सासूला अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा तत्पर संकल्प सोडला आहे. पिंपळखुटा येथील शिला देविदास डोंगरे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्या ५५ वर्षाच्या होत्या.

मृत्यूपूर्वी त्यांनी अवयव व देहदान करण्याचा संकल्प सोडला. तशी भावना मुलांजवळ बोलून दाखविली होती. परंतु ते शक्य झाले नाही. कारण काही तांत्रिक कारण व विलंब आडवा आला. त्याची रुखरुख मुलांना लागली. आईची शेवटची इच्छा आपण पूर्ण करू शकलो नाही, अशी बोच मुलांना लागली. आता ती दूर करावी म्हणून कुटुंबात विचारविनिमय झाला. आईला वेगळ्या पद्धतीने व एक संदेश समाजास जावा, असा निर्णय पुढे आला. दर्शन व रितिक डोंगरे या दोन्ही मुलांनी मग मरणोत्तर देहदान करण्याचा मानस ठेवला. या कुटुंबात काही दिवसापूर्वीच विवाह करीत सून म्हणून आलेल्या नम्रता दर्शन डोंगरे हिने पण या निर्णयास साथ देत देहदान करण्याचा निर्णय घेऊन टाकला. केवळ निर्णयच घेतला नाही तर सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या ग्रामीण रुग्णालयात मरणोत्तर देहदान करण्याचा अर्ज भरून दिला. या तिघांचा हा निर्णय केवळ आईची अपूर्ण ईच्छा पूर्ण करणाराच नव्हे तर समाजास एक संदेश देणारा ठरला असून त्याची अभिनंदरपर चर्चा सुरू झाली.

मुलांचे वडील देविदासजी डोंगरे यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झालेला. त्यामुळे कुटुंबाचा आधारच गेल्याची स्थिती. अशा परिस्थितीत आई शिला डोंगरे यांनी कुटुंबाची जबाबदारी शिरावर घेतली. परिस्थितीचा सामना केला. दोन्ही लहान मुलांचा सांभाळ करीत कुटुंबाचा गाडा ओढला. ही जाण मुलांनी ठेवली. आईने चांगले जीवन दिले, कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही, या भावनेचा विसर मुलांनी पडू दिला नाही. मुलाचे लग्न करून दिले. अशा आईची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही, याची हळहळ होतीच. म्हणून ही ईच्छा वेगळ्या पद्धतीने या कुटुंबाने पूर्ण करीत श्रद्धांजली अर्पण करण्याचा अनोखा दाखला समाजपुढे आज ठेवला.

Story img Loader