वर्धा: आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्या भारतीय युवकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. मोठमोठ्या कंपन्यांचे सुकाणू भारतीयांच्या हातात आहे. तसेच विविध शोध प्रकल्प, शिष्यवृत्ती पटकविण्यात पण असे युवक दिसून येतात. देवळीचा शंतनू अशोक राऊत हा असाच एक अभ्यासू विद्यार्थी. स्थानिक पातळीवार माध्यमिक व पुढे विजयवाडा येथून त्याने उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. आर्किटेक्ट होण्यासाठी मागे सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठात प्रवेश घेतला. आता पुढे काय, तर संशोधन करण्याचे त्याने ठरविले.

त्यासाठी जर्मनी विद्यापीठाची निवड केली. इंटरनॅशनल अर्बन डेव्हलपमेंट या विषयात एम. एस. ही पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केली. याच दरम्यान त्याला एका संधीने खुणावले. त्याचा निरंतर शहरी नियोजन आणि समूह सहभाग या विषयाचा गाढा अभ्यास झाला होता. युरोपियन युनियनतर्फे होरीझॉन युरोप हा कार्यक्रम राबविल्या जात असतो. त्यास युनोचे आर्थिक सहाय्य मिळते. विविध विषयावर संशोधन घडवून आणण्यासाठी हा कार्यक्रम असतो. त्यात पर्यावरणपूरक शहरे हा एक विषय आहे. युनियन त्यासाठी जागतिक पातळीवार परीक्षा घेते. असंख्य विद्यार्थी ही परीक्षा देतात. ही फेलोशिप जगातील सर्वात आव्हानात्मक व प्रतिष्ठित अशी समजल्या जाते. युनोच्या संशोधन निधी प्रकल्पचे त्यास सहकार्य मिळते. त्यात बारा विद्यार्थी जगभरातून वेगवेगळ्या विषयासाठी निवडल्या गेलेत. भारतातून शंतनूची निवड झाली. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मग वेगवेगळ्या विद्यापीठात संशोधन कार्यास पाठविल्या जाते. शंतनू याची निवड इटली येथील हजार वर्ष जुन्या अश्या बोलोनिया विद्यापीठात करण्यात आली. नोबेल विजेत्या मेरी क्युरी यांच्या नावाने हा उपक्रम तिथे चालतो.

हेही वाचा : महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस

शंतनू राऊत हा भविष्यातील पर्यावरण पूरक व प्रदूषनमुक्त शहरे कशी असावी याविषयी संशोधन कार्य करणार. प्रदूषण हे जगापुढील सध्या सर्वात मोठे आव्हान समजल्या जाते. शहरे दिवसेंदिवस मोठी होणार. तसतसे प्रदूषण पण वाढणार. अशी जागतिक आव्हाने व त्यावर उपाय शोधणारा हा प्रकल्प आहे. त्यावर उपाय योजता येतील याचे सादरीकरण शंतनू करणार. उदारनार्थ शहरात ए.सी. लावण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. त्यामुळे गरम हवेचे उत्सर्जन होत असते ते प्रदूषणात भर टाकणारेच ठरते. अशाच अन्य समस्या भविष्यात उभ्या ठाकणार. त्याचा वेध घेणे व उपाय सुचविण्याचे हे संशोधन कार्य आहे. शंतनूचे वडील सिव्हिल इंजिनिअर असून ते शहर नियोजन आराखड्याचे अभ्यासक तर आई गृहिणी आहेत. शंतनूची ही जागतिक भरारी देवळीकरांसाठी अतीव आनंदाची बाब ठरत आहे. खासदार अमर काळे, आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, शेतकरी नेते किरण ठाकरे यांनी राऊत कुटुंबास भेटून अभिनंदन केले आहे.

Story img Loader