जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष समीर सुरेशराव देशमुख यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत प्रवेश झाला. शरद पवार यांच्याच हस्ते पक्षप्रवेशाचा नारळ स्वीकारण्याची त्यांची इच्छा पक्षाने पूर्ण केली आहे. महिन्याभरापूर्वी पवार यांच्या वर्धेतील कार्यक्रमात त्यांचा प्रवेश होणार म्हणून चर्चा झाली होती. पण पक्षप्रवेश कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची वेळेवर घोषणा झाल्याने त्यांच्यावर पवार कुटुंब अद्याप नाराज असल्याचे म्हटले गेले. कारण गत विधानसभा निवडणुकीत त्यांनी राकाँला सोडचिठ्ठी देत शिवसेनेतर्फे देवळी विधानसभेची जागा लढवल्याने राकाँ धुरीण त्यांच्यावर नाराज झाले होते.
हेही वाचा >>> नागपूर : ‘त्या’ आंदोलनाबाबत काँग्रेस नेत्यांवर ३८ वर्षांनंतर खटला
त्याची घरवापसीची तयारी लगेच सुरू झाली. पण मुहूर्त मिळत नव्हता. त्यांचे विरोधक हा मुहूर्त कधीच निघणार नाही, असा टोमणाही मारत. पण अखेर अनेक दशकांपासून पवारांसोबत राहिलेल्या देशमुख कुटुंबाच्या राजकीय वारसदार माफी देत पुढील वाटचाल मोकळी करण्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळात आज बोलले जात आहे. यावेळी जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख व अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. मी पूर्वीच पक्ष सदस्य झालो आहे. आता ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन पक्षासाठी भरीव योगदान देण्याची तयारी करणार असल्याचे समीर देशमुख म्हणाले.