वर्धा : पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची भावना आता लहान गावात पण पोहचल्याचे हे उत्साहवर्धक उदाहरण. शहरातील सांडपाणी नदीत जाणार नाहीच, अशी ठाम व ठोस हमी हिंगणघाटकरांना लेखी स्वरूपात मिळाली आहे. वणा नदी ही या गावची जीवनदायीनी. मात्र त्यात बारा हजार घरातून निघणारे सांडपाणी सोडल्या जात होते. हे मोठ्या प्रमाणातील दूषित पाणी नदीस प्रदूषित करीत असल्याचे पाहून वणा नदी संवर्धन समिती नागरिकांनी स्थापित केली.कित्येक वर्षांपासून या घाण पाण्याचा प्रवाह अस्वस्थ करणारा ठरला. हे दूषित पाणी अन्य ठिकाणी वळवावे म्हणून समितीने तिरंगा हाती घेऊन आंदोलन केले. घाण पाण्यात कार्यकर्ते कित्येक तास उभे राहले. त्याची अखेर दखल झाली. पालिकेचे काही अधिकारी आश्वासन घेऊन आले. या विषयावर बैठक घेऊन चर्चा करू, अशी लेखी हमी मिळाली. आंदोलन मागे घेण्यात आले.

शेवटी तो दिवस उगवला. चर्चा गरमागरम आवाजात झाली. जीवन प्राधिकरण व नगर पालिका यात समन्वय नसल्याचे दिसून आले. या ठिकाणी चालणारा जल शुद्धीकरण प्रकल्प पुरात बिघडला. त्याची दुरुस्ती झाली. पण त्या प्रकल्पत हिंगणघाट व अन्य गावातील दूषित पाणी येतच असल्याचे आंदोलक कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. या शुद्धीकरण प्रकल्पची बरीच कामे शिल्लक आहेत. ती पूर्ण झाली की घाण पाणी शुद्धीकरण प्रक्रिया राबविण्यात येणार.

सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ६० दिवस लागू शकतात. मात्र या साठ दिवसाच्या कालावधीत शहरातील नाल्याचे पाणी शुद्ध करीत वणा नदीत सोडू, अशी लेखी हमी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी शेवटी दिली. मात्र दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक ठरते. तो मिळाला तरच शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार, अशी स्थिती. म्हणून तोपर्यंत दूषित पाणीच घरी येणार, अशी स्थिती असल्याची भावना व्यक्त झाली.

पालिका मुख्याधिकाऱ्यांनी नदीत जाणारे दूषित पाणी थांबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठपुरावा सूरू केला. या कामासाठी लागणाऱ्या निधीचे अंदाजपत्रक ठरणार. ते आल्यानंतर हे काम शासनाच्या निधीतून किंवा पालिकेच्या स्व निधीतून केल्या जाईल, अशी हमी मात्र मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी लेखी दिली आहे. नदी संवर्धन समितीचे रुपेश लाजूरकर, शुभांगी डोंगरे,तुषार हवाईकर, नितीन क्षीरसागर, देवा कुबडे, सतीश धोबे, अशोक मोरे, सुरज कुबडे, वसंत पाल, दीपक जोशी, आशिष भोयर, मारोती महाकालकर, मनीष देवढे, उमेश डेकाटे, राकेश झाडे व अन्य यावर लक्ष ठेवून आहेत.

Story img Loader