वर्धा : भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील दैदिप्यमान इतिहासाची सोनेरी पाने रोमांचकारी घटनांनी भरली आहे. सामान्यपणे गुगल किंवा अन्य समाज माध्यमावर सर्व माहिती उपलब्ध असते. मात्र या सोनेरी इतिहासतील क्षण तिथे पण बघायला मिळणार नाहीत. ते फक्त इथेच.
केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासनतर्फे या आगळ्या वेगळ्या दुर्मिळ घटना टिपणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन सुरू झाले आहे.१८५७ ते १९४७ या काळात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक व राष्ट्रपुरुषांची माहिती देणारी दुर्मिळ छायाचित्रं लावण्यात आली आहे. त्यात प्लासीची लढाई, संन्यासी विद्रोह, राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, तात्या टोपे, मंगल पांडे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांची कधीही पाहण्यात नं आलेली चित्रे इथे आहेत. तसेच राजा राममोहन रॉय ते महात्मा गांधी आदी थोर पुरुषांच्या जीवनातील रोमांचकारी व इतिहास घडवीणाऱ्या घटना चित्रबद्ध स्वरूपात आहेत. चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, चौरिचौरा, खिलाफत चळवळ, असहयोग, कित्तूर विद्रोह, बारडोली सत्याग्रह याखेरीज बरेच काही आहे.मल्टी मीडिया पद्धतीने त्याचे सादरीकरण झाले आहे. त्याचे उदघाटन आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. पुढील पिढीस हा इतिहास डोळ्यात साठवून घ्यावा असा राहणार. त्यांना हे प्रदर्शन पाहण्यास प्रोत्साहित करावे असे आ. भोयर म्हणाले. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू के. के. सिंग, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी हंसराज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. जे कुठंच पाहायला मिळणार नाही, ते क्षण इथे पाहायला मिळणार असल्याने नागरिक व प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी अवश्य ही प्रदर्शनी बघावी, असे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलात लागलेली ही प्रदर्शनी १६ ऑगस्ट सायंकाळ पर्यंत निशुल्क पाहायला मिळणार.
हेही वाचा…‘लाडकी बहीण’ योजनेच्या समितीवर चक्क काँग्रेसच्या आमदार! या किमयेची चर्चा….
भारताच्या इतिहासातील या दुर्मिळ नोंदी आहेत. स्वातंत्र्यासाठी काय काय योगदान द्यावे लागले, कुणी आयुष्य वेचले, फाळणीच्या दुःखद आठवणी याची माहिती पुढील पिढीस असलीच पाहिजे. शासनाने जतन करुन ठेवलेला हा ठेवा जनतेसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.याच सभागृहात हर घर तिरंगा, विभाजन विभीषीका, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याची पण माहिती सचित्र उपलब्ध आहे.प्रदर्शनी आयोजनात प्रवीण कुऱ्हे, उमेश महतो, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, शिक्षणाधिकारी मनिषा भडंग यांचे योगदान आहे.