वर्धा : आर्वी मतदारसंघातील उत्कंठा आता सीमेला पोहोचली आहे. भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांना पक्षाने तिकीट नाकारली. सुमित वानखेडे यांना अंतिम टप्प्यात जाहीर केली. अर्ज परत घेण्यासाठी धावपळ आणि दादाराव केचे झाले नॉट रिचेबल. सहकार मंगल कार्यालयाजवळ असणारी चहाची कॅन्टीन हा केचे यांचा अनेक वर्षांपासूनचा अड्डा. सकाळी फिरून आल्यावर तिथे चहासोबत गप्पांना उधान. ४०, ५० व्यक्ती आणि दादांच्या ऑर्डरवर ऑर्डर. पण आज तिथे शुकशुकाट असल्याचे या गप्पात रमणारे विजय अजमिरे सांगतात. आम्ही शाळेपासूनचे मित्र. पण उमेदवारी एकास म्हणून दादांनी ऐकावे, असे आम्हास वाटते, असे ते म्हणतात. त्यांचा फोन बंद व घरीही नसल्याचे सांगण्यात येते. आज वानखेडे यांची अर्ज मिरवणूक आहे. त्याच्या बॅनरवर केचे यांचा फोटो आहे. वानखेडे म्हणतात केचे आमचेच. त्यांचा फोटो असलाच पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘…तर ‘नोटा’ला मतदान’ हलबा समाज भाजप, काँग्रेसवर नाराज

हेही वाचा – फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…

केचे यांनी वानखेडे यांचा मार्ग मोकळा करावा म्हणून सर्व ते प्रयत्न झाले व अजूनही होत आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सोबत झालेल्या बैठकीत केचे यांची सर्व ती समजूत काढण्यात आल्याचे आर्वीतून त्यांच्यासोबत गेलेले एक नेते सांगतात. डिसेंबर महिन्यात विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. विधानसभा आमदारातून या जागा भरल्या जातात. त्यात भाजपतर्फे पहिले नाव केचे तुमचेच राहील. आम्ही हमी देतो. तरीही तुमचा विश्वास नसेल तर राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याकडे नेवून परत वदवून देतो. अन्य काय असेल ते पण ऐकू. असे केचे यांना समजावण्यात आले. एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य करण्याचा दंडक मोठमोठ्या नेत्यांनी पाळला आहे. म्हणून तुम्ही पण सच्चा स्वयंसेवक म्हणून अर्ज परत घेत वानखेडे यांच्या विजयासाठी झटावे, अशी गळ नागपूरच्या बैठकीत घालण्यात आल्याचे या केचे सहकाऱ्याने लोकसत्तास सांगितले. बैठकीत उपस्थित सुधीर दिवे यांनी नमूद केले होते की दादा ऐकतील. मात्र आज केचे यांचा अज्ञातवास सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारा ठरत आहे. मंगळवारी सकाळपासून दादांची समजूत काढण्याचे प्रयत्न जोमात सुरू झाले आहे. मात्र ही फूट कायम राहणार असे गृहीत धरून काँग्रेस गोट मात्र आनंद व्यक्त करीत असल्याचेही चित्र दिसून येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha guarantee of mlc seat and national president in first phase still dada keche not reachable pmd 64 ssb