वर्धा : आज १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सुट्टी असल्याने अनेकांनी मौजमजा करण्याची संधी घेतली. तसेच या घटनेत झाले. येथील तीन मित्रांनी कामाला सुट्टी म्हणून नदीवर आंघोळ करण्याचा बेत आखला. मात्र दुर्दैव आडवे आले.
उत्तर प्रदेश येथून काही लोकं वर्ध्यात पीओपीचे काम करण्यास आले आहे. येथील कारला चौकात ते भाड्याने घर करीत राहू लागले. आज सुट्टी असल्याने कोणीही कामावर गेले नाही. त्यापैकी आठ मित्र पवनार येथील धाम नदी पात्रावर आंघोळ करण्यास गेले. यातील तिघांनी नदीत उड्या घेतल्या. जुमय खान, नासिर खान व रेहान खान हे नदीत उतरल्यावर यापैकी जुमय खान व नासिर खान यांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. ते पाण्यात दूरवर वाहून गेले. तर रेहान खान हा थोडक्यात वाचला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर चमू घटनास्थळी पोहोचली. आपत्ती व्यवस्थापनाची चमू नदीत वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत आहे. उशिरा प्राप्त माहितीनुसार बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे.
स्वातंत्र्यदिनी सन्मान
भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनामित्त जिल्हा क्रीडासंकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात विरमाता व विरपत्नींचा सत्कार करण्यात आला. विरमाता शांताबाई वरहारे, विरमाता नलीनी विनायकराव टिपले, विरपत्नी जयश्री चौधरी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख कमलाकर घोटे तसेच लाहोरी येथील वाघाडी नाल्याला आलेल्या पुरामध्ये टेम्पो वाहून गेला होता. त्यावेळी टेम्पोमधील ३ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा – १८५७ ते १९४७! या टप्प्यातील इतिहास, जो कुठेच नाही तो येथे बघा…
स्काऊट व गाईड राज्य पुरस्कारासाठी अभिमान फुलमाई, राजवर्धन येवले, देवांश लोहकरे यांना स्काऊट पुरस्कार तसेच भूमी परतेती, नुतन देशमुख यांना गाईड पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पीयुपी परिक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवडलेले विद्यार्थी रोहन देवेंद्र दाते, संघर्ष संदिप वानी यांना प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हेही वाचा – राज्यात विजेच्या मागणीत ३ हजार मेगावॉटची वाढ; पावसाने उसंत घेतल्याने…
लोकसेवा हक्क अधिनियम २००५ अंतर्गत १०० टक्के सेवा देणारे अधिकारी म्हणून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदचाचणी अधिकारी सागर तानाजी सांळुखे व आर्वीच्या प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया विजय वायवळ यांना सन्मानित करण्यात आले.