वर्धा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीचा सोपस्कार गुरुवारी सायंकाळी आटोपला. निरीक्षक माजी मंत्री नितीन राऊत व बंडोपन्त टेम्भूरणे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी प्रश्न विचारले. राऊत यांनी एकच मार्मिक प्रश्न शेखर शेंडे यांना विचारत संभाव्य स्थिती उजेडात आणली. रणजित कांबळे यावेळी तरी मदत करणार का, या प्रश्नावर शेंडे म्हणाले की आम्ही त्यांना नेतेच मानतो. ते मदत करतील. सोबत त्यांचे बंधू रवी व आकाश शेंडे तसेच प्रवीण हिवरे होते. यापूर्वी पण पंजा चिन्हवार लढले. पण विजय मिळाला नाही. आत्ताच खात्री का वाटते, असे विचारल्यावर काँग्रेसला हवा अनुकूल आहे. तिकीट मिळाली तर मी १०० टक्के निवडून येणार, अशी ग्वाही शेंडे यांनी दिली.

हेमलता मेघे म्हणाल्या की आता बस झाले. महिलांना उमेदवारी मिळाली पाहिजे. आमची दखल पक्ष घेणार केव्हा, असा थेट सवाल त्यांनी केला. आमदार रणजित कांबळे यांची जुजबीच मुलाखत झाली. डॉ. सचिन पावडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा पाढा वाचला. मी कसा समर्थ उमेदवार ठरू शकतो, हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डॉ. उदय मेघे यांनी पण आरोग्य विषयक कार्याची माहिती दिली. अनेकांनी निष्ठावंत काँग्रेस नेत्यासच उमेदवारी द्या, असा घोषा लावला. प्रा. सुजाता सबाने झाडे यांनी सबाने कुटुंबातील आपणच आता एकमेव वारसदार असल्याने तिकीट देण्याची मागणी केली.

हेही वाचा – बहुचर्चित गायवाटप घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई नाहीच; लाभार्थी, कर्मचाऱ्यांचे पुन्हा जबाब…

आर्वीतून अनंत मोहोड यांनी आर्वी काँग्रेसनेच लढवावी, मित्रपक्षांस ही जागा सोडू नये, असा आग्रह धरला. तसेच शैलेश अग्रवाल, प्रिया शिंदे, बाळा जगताप, शैलेश निंभोरकर, अरविंद लोहे, सोमराज तेलखेडे, चंद्रशेखर जोरे यांनी मुलाखत दिली. हिंगणघाट येथून विजया धोटे, अर्चना भोमले, पंढरी कापसे, प्रवीण उपासे व धर्मापाल ताकसांडे यांनी इच्छा दर्शविली. वर्ध्यातून सुधीर पांगुळ, राजेंद्र शर्मा, शैलेश अग्रवाल, पुरुषोत्तम टोणपे हे अन्य इच्छुक होते. देवळीतून चारूलता टोकस यांनी अर्ज केला आहे. पण त्या या मुलाखतीस आल्याच नाही तर वर्ध्यातून डॉ. शिरीष गोडे उपस्थित झाले नाही. जिल्हाध्यक्ष चांदुरकर यांचाही अर्ज आणि ते मुलाखत घेणारे पण. म्हणून निरीक्षक राऊत यांनी गंमतीने म्हटले की तुम्हीच उभे राहणार तर जबाबदारी कोण सांभाळणार.

हेही वाचा – परिचारिका अभ्यासक्रमाचा पेपर फुटला, बुलढाण्यात विद्यार्थ्यांकडे आढळली…

चांदुरकर म्हणाले की ही प्रक्रिया पारदर्शी पार पडली. जनतेशी नाळ जुळून असलेला उमेदवार प्रत्येक मतदारसंघात देणार, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र यावेळी प्रथमच निरीक्षकांनी संभाव्य तीन उमेदवारांचे पॅनल इथेच तयार केले नाही.