वर्धा : नित्य नवे गुन्हे व ते करणारे गुन्हेगार हे पोलिसांसाठी नेहमी आव्हानात्मक काम ठरते. त्यातच समाजाची टोळी तयार करीत गुन्हा करणारे आहेतच. असा एक प्रकार वर्ध्यात उघडकीस आला असून आरोपीस कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव गबरू उर्फ मिस्कीन वल्द मन्सूर अली रा. बिदर, कर्नाटक असे आहे. त्याने अंगठी चोरीचाच गुन्हा केला. मात्र त्याचा शोध घेत असताना मोठे रहस्यच पुढे आले. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी त्याचा उलगडा केला.
इराणी आरोपी हे वृद्ध लोकांना प्रथम हेरतात, त्यांना सावज करायचे ठरवितात. मग त्याच्याशी बोलून पुढे जाऊ नका, दंगल झाली आहे, अशी बतावणी करतात. खून झाला, तपासणी सुरू आहे, असेही सांगतात. तेव्हाच वृद्धाकडून त्याची अंगठी, चेन, महिला असल्यास मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगतात. हे दागिने एका कागदात बांधून त्याची पुडी तयार करतात. नंतर ती पुडी शिताफीने बदलून टाकतात. फसलेले वृद्ध जेव्हा घरी गेल्यावर पुडी उघडतात तेव्हा त्यात सोने गायब होत केवळ दगड आढळून येतात. इराणी वस्तीतील लोकं वस्तीतून इतरत्र जात नाही. मात्र बाहेरील व्यक्ती त्यांच्या वस्तीत गेल्यास ते सतर्क होत लक्ष ठेवून असतात. त्यामुळे त्यांच्याबाबत माहिती घेणे पोलिसांना फार अवघड ठरते.
हेही वाचा – नागपूर : भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू, ७ जण गंभीर
हेही वाचा – अकोला : अकरावीच्या १० हजारावर जागा रिक्त राहणार, नेमके कारण काय?
अशा गुन्हेगारांचा शोध वर्धा पोलिसांनी आता लावला आहे. काही दिवसांपूर्वी येथील महाराष्ट्र बँकेजवळ एक गुन्हा घडला होता. बँकेच्या बाजूला असलेल्या कपडे प्रेसच्या दुकानात काम करणाऱ्या एका वृद्धाची फसवणूक झाली. त्यास पोलीस असल्याचे सांगून सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर हा गुन्हा गबरू तसेच त्याचा मुलगा मुजाहीद याने केल्याचे स्पष्ट झाले. ते बिदर येथील असल्याचे समजले. त्यांचा शोध घेण्यासाठी वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. पोलीस इराणी वस्तीत पोहोचताच तेथील महिला झुंडीने पुढे आल्या. रस्त्यावर उतरून आरडाओरड करू लागल्या. तेव्हा पोलिसांच्या संयमाची कसोटीच लागली. मात्र पोलीस पथकाने शिताफीने वस्तीतून आरोपीस बाहेर काढण्यात यश प्राप्त केले. आरोपीने यवतमाळ येथे पण असाच गुन्हा केल्याचे मान्य केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी तसेच अमोल लगड, नरेंद्र पारशर, नितीन इतकरे, संघसेन कांबळे, मिथुन जिचकर, गजानन दरणे, सायबर शाखेचे अनुप कावळे यांनी फत्ते केली.