वर्धा : लहान गावात शिकून आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणारे विरळेच. त्यामुळे त्यांचे यश नेत्रदीपक म्हटल्या जाते. असे यश मिळवून परत जमिनीवर पाय ठेवून गरजू लोकांना मदत करण्याची भावना असणे महत्वाचे. तसेच क्षितिजा वडतकर वानखेडे यांच्या बाबतीत म्हटल्या जाते.

श्रीमती वानखेडे या वर्धेकर व आर्वीकरांच्या सूनबाई. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातनाम फोर्बस मासिकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण दिल्लीत संपन्न झाले. दिल्लीतील ताज पॅलेस येथे संपन्न सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पिंदल, न्या. माहेश्वरी व महाधिवक्ता व्यंकट रमय्या यांच्या हस्ते हे पुरस्कार वानखेडे यांनी स्वीकारले.

तीन वर्षातून एकदा हे पुरस्कार देण्यात येत असतात. सर्वोत्कृष्ट संस्थापक व सर्वोत्कृष्ट विधिज्ञ अश्या दोन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या भारतातील एकमेव ठरल्या आहेत. फोर्बस लीगल पॉवरलिस्ट श्रेणीतील हे पुरस्कार आहेत. अश्या त्या पहिल्याच वकील. त्या मुंबई लॉ फर्म्सच्या संचालक आहेत. स्वबळावर त्या १५ वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झाल्या होत्या. कायदेविषयक काम सूरू केले. महिला व वंचित घटकास त्यांचे हक्क मिळवून देणारी वकील, अशी प्रारंभीक ओळख. त्या क्षेत्रात दबदबा निर्माण झाल्यानंतर अन्य क्षेत्रात कायदा सर्वोच्च हे दाखवून दिले.

फोर्बसचे पुरस्कार हे कसून तपासणी करीत दिल्या जात असल्याचे म्हटल्या जाते. माहितीचा कागदोपत्री पुरावा, साक्षीदार तपशील व अन्य बाबी ज्युरी मंडळी आवर्जून तपासतात. म्हणून हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त समजल्या जातो.

हा बहुमान आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान देणारा आहे, अशी प्रतिक्रिया क्षितिजा सुमित वानखडे देतात. त्यांना यापूर्वी २००७ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून विद्यार्थी दशेत पुरस्कार लाभला होता. तसेच २०२३ मध्ये इंडिया टुडे या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेने भारतातील पहिल्या आठ उदयोन्मुख महिलात त्यांचा समावेश करीत सन्मान केला होता. संविधान व मानवाधिकार या विषयात त्यांना पी. एचडी. पदवी प्राप्त झाली आहे. येथील समाजसेवी प्रा. गुणवंत वडतकर यांच्या त्या कन्या असून आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांच्या अर्धांगिनी होत.