वर्धा : काँग्रेस समितीने आंदोलन छेडले. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आणि त्याची जाण राज्य सरकारला नाही, म्हणून नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज आंदोलन करण्याचा उपक्रम जाहीर केला होता. यात सर्वांनी सहभागी होण्याचे निर्देश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. पण प्रमुख नेत्यांनीच दांडी मारली. त्यात जिल्हा काँग्रेस समितीचे सर्वेसर्वा व माजी आमदार रणजित कांबळे हे प्रमुख गैरहजर. प्रमुख नेत्यांपैकी चारूलता टोकस, अनंत मोहोड, डॉ. उदय मेघे, प्रवीण हिवरे, सुधीर पांगुळ, अविनाश काकडे, बाळा जगताप, सुनील कोल्हे, बाळा माउस्कर सागर सबाने प्रामुख्याने उपस्थित होते.
रणजित कांबळे हे गैरहजर असल्याचे पाहून शेखर शेंडे यांनी नाव न घेता संताप व्यक्त केला. आंदोलन आयोजनासाठी दोन दिवसापूर्वी बैठक बोलावण्यात आली होती. तेव्हा पण रणजित कांबळे गैरहजर होते. तेव्हा शेखर शेंडे यांनी नाराजी नोंदविली. ते म्हणाले की, त्याने (कांबळे) यायला पाहिजे नं. निव्वळ कार्यकर्ते पाठवून देतो. कार्यकर्ते काय सालदार आहेत का. यापुढे हे खपवून घेता कामा नये. तो येत नाही तर यापुढे आम्ही पण येणार नाही. पाठवून देवू कार्यकर्ते. आंदोलनात कधीच नसणारे तिकीट घेऊन येतात. निवडून द्या म्हणतात. पक्ष जगणार कसा, व सत्ता येणार कशी याचा विचार प्रदेश नेत्यांनी केला पाहिजे, असा संताप शेखर शेंडे यांनी व्यक्त करून टाकला आणि आंदोलनात जाणे टाळले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज ३ मार्च रोजी आयोजित आंदोलनासाठी सर्वांना आवाहन केले होते.मोठ्या संख्येने कार्यकर्ते व सर्व प्रमुख नेत्यांनी आंदोलनास हजर राहलेच पाहिजे, असा इशारा दिला होता. त्यास प्रमुख नेते म्हणजे जे विधानसभा निवडणूक लढले ते रणजित कांबळे व शेखर शेंडे आलेच नाही. कांबळे येणारच नाही हे गृहीत धरून शेंडेही आले नाही. कांबळे यांनी चेलेचपाटे पाठविले, तर शेंडे यांनी त्याचीच ‘री’ ओढली. पण चारूलता टोकस व मनोज चांदुरकर यांनी आंदोलन करून सोपस्कार पूर्ण केल्याची चर्चा झाली.
रणजित कांबळे येत नाही, तर मीच कशाला येवू…
जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर म्हणाले की, रणजित कांबळे यांनी अनंत घारड यांची तेरवी असल्याचे सांगत येणे शक्य होणार नाही, जमले तर येतो असे कळविले होते. शेखर शेंडे यांनी आंदोलनसाठी झालेल्या सभेत नेते येत नाही, तर मीच कशाला येवू, असे स्पष्ट करून टाकले होते. पण आम्ही आंदोलन यशस्वी केलेच.