वर्धा : कार्यालय व प्रचार यंत्रणा याबाबत बऱ्याच पुढे असलेल्या भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना मात्र कार्यालयाची विवंचना लागली आहे. अद्याप त्यांचे अधिकृत कार्यालय झालेले नाही. निवास म्हणून त्यांनी हिमालय विश्व परिसरात घर घेतले. पण ते दूरवर व संपर्काच्या सोयीचे नसल्याच्या तक्रारी झाल्यात. म्हणून मग नव्याने कार्यालय शोधू लागले आहे.
हेही वाचा – नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भारधाव ट्रकची धडक
एक घर प्रस्तावित असल्याचे ते सांगतात. माजी खासदार दिवंगत संतोषराव गोडे यांचा नामफलक असलेले व सध्या त्यांचे पुत्र डॉ. शिरीष गोडे यांचे निवासस्थान असलेले घर टप्प्यात आहे. डॉ. गोडे व पक्षनेते अनिल देशमुख यांच्यात याबाबत चर्चा झाली. डॉ. गोडे म्हणतात, माझे निवासस्थान कार्यालय म्हणून वापरण्याची सूचना केली. तीच अंमलात येईल. अद्याप अधिकृत परवानगी घेतलेली नाही. मात्र, मंडप टाकला आहे. आर्वी रोडवरील हे घर सर्वपरिचित आहे. मोठा राजकीय वारसा व प्रशस्त असल्याने या ठिकाणी कार्यालय करणे उचित ठरेल, अशी भावना आहे. त्यामुळे हिमालय विश्व येथील निवासस्थान हे वॉररूम तर गोडेंचे घर अधिकृत कार्यालय होवू शकते, असा विचार झाला. मात्र स्वतःचे व पक्षाचे स्वतंत्र कार्यालय राखून असणाऱ्या भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या तुलनेत अद्याप मागे पडल्याने कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे चित्र दिसून येते.