वर्धा : जसजशी मतदानाची वेळ जवळ येत चालली आहे तसतशी सर्वच उमेदवारांची लगबग वाढू लागली आहे. तगडे आव्हान उभे असल्याचे गृहीत धरून भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. कसलेला राजकीय मल्ल म्हणून ओळख असणारे रामदास तडस हे पण कसलीच कसर राहू नये म्हणून दक्ष झाल्याचे दिसून येते.
मतदारसंघात भाजपचे डॉ. पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार व प्रताप अडसड हे चार आमदार आहेत. आमदार मंडळी करीत असलेल्या प्रचार कार्याचा परत आढावा घेणे गरजेचे म्हणून रात्री उशीरा बैठक झाली. उमेदवार तडस यांच्या निवासस्थानी संपन्न या बैठकीत चार आमदार, क्षेत्र प्रमुख सुमित वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट उपस्थित होते.
हेही वाचा : “आश्वासनांचे अपयश लपविण्यासाठीच पंतप्रधान मोदींकडून ४०० पारचा नारा”, काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांची टीका
आढावा संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी घेतला. केवळ सभेत दिसू नका. कार्यालयात बसून केवळ आढावा घेणे सोडून द्या. स्थानिक पातळीवर थेट संपर्कात असणाऱ्या माजी जि. प. तसेच पं. स. सदस्यांच्या कामावर देखरेख ठेवा. त्यांच्याकडून काम करवून घ्या, अशा सूचना झाल्या. दोन आमदारांनी उमेदवार तडस यांच्याबाबत काही मुद्दे मांडले. तेव्हा आता ते जाऊ द्या, असे स्पष्ट करीत नाराजी दूर ठेवत ‘चारसो पार’चे उद्दिष्ट ध्यानात ठेवण्याची विनंती झाली. बैठकीत उपस्थित जिल्हाध्यक्ष गफाट म्हणाले की आमदारांना काही सूचना करण्यात आल्या. तसे बदल एकदोन दिवसांत दिसून येतील, असे ते म्हणाले.
हेही वाचा : मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
धामणगाव व मोर्शी या दोन विधानसभा क्षेत्रात अडचणी आहेत. मोर्शी येथील जबाबदारी खासदार डॉ. अनिल बोन्डे यांच्याकडे आहे. मात्र ते अमरावती मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून असल्याचे यावेळी निदर्शनास आणण्यात आले. स्थानिक आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार गटाचे म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. पण त्यांचे काही खरे नाही. कधी ते अजित तर कधी शरद पवार यांच्यावर प्रेम व्यक्त करतात, अशी टिपणी झाली. त्यामुळे यासाठी काही करू, असे उमेदवार तडस यांना आश्वस्त करण्यात आले. यावेळचे आव्हान कडवे आहे, हे मान्य करीत सर्वांनी अधिक जोमाने कामाला लागण्याचा निर्धार केला.