वर्धा : प्रत्येक जिल्ह्यात राजकारणात मातब्बर अशी काही कुटुंबे असतात. त्यांची भूमिका महत्त्वाची राहते. निवडणूक काळात तर कुटुंबातील वजनदार आसामींचा आशीर्वाद घेतलाच जातो. वर्धा जिल्ह्यात ज्येष्ठ नेते दत्ता मेघे व त्यांचा परिवार असाच आब राखून आहे. १९९८ पासून दत्ता मेघे हे जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर त्यांनीच पक्षाची बांधणी सूरू केली. मात्र यश आले नाही. ते काँग्रेस तर्फेच दोन वेळा खासदार झाले. त्यानंतर थेट २०१४ मध्ये जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा करीत त्यांनी पुत्र सागर व समीरसह भाजप मध्ये प्रवेश घेतला. मोदींच्या नेतृत्वातील त्या पहिल्या निवडणुकीत सागर मेघे हे भाजप विरोधात काँग्रेस तर्फे उभे राहून पराजित झाले होते. लगेच हा परिवार भाजप मध्ये आला. आता पक्ष सोडणे नाही असा त्यांनी पण जाहीर केलं तर आता राजकारण करणे नाही असे सागर यांनी घोषित केले. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सागर यांना उभे करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर होत असतांनाच खासदार रामदास तडस यांनी टाकलेला जातीय धोबीपछाडचा डाव यशस्वी ठरला. मेघे मागे पडले. मात्र जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत दत्ता मेघे यांचा शब्द भाजपमध्ये परवलीचा ठरे.
हेही वाचा : ‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…
आता सामसूम आहे. ही पहिलीच अशी निवडणूक ज्यात मेघे कुटुंबातील कोणीच दिसत नाही. हे असे कां, या प्रश्नावर मेघे कुटुंबाचा सामाजिक चेहरा म्हणून ओळख दिल्या जाणारे डॉ. उदय मेघे म्हणतात की सक्रिय उपस्थिती नाही असे म्हणता येणार नाही. साहेब हे प्रकृती अस्वस्था मुळे फारसे घराबाहेर पडत नाही. समीर मेघे नागपुरात सक्रिय आहे. सागर मेघे पूर्णवेळ राजकारणात नाहीच. मात्र चार दिवसापूर्वी उमेदवार रामदास तडस यांना सावंगी येथे बोलावून घेत प्रमुख सहकारी मंडळींसोबत चारवंगा झाली होती. दत्ता मेघे यांनी काही सूचना पण केल्यात. आता पुढील एक दोन दिवसात सागर मेघे हे बैठक घेण्याची शक्यता आहे, असे डॉ. उदय म्हणाले.
हेही वाचा : ‘शर्यत जिंकायची तर कासव गतीने चला…’, भाजपचा कानमंत्र
एक निश्चित की लोकसभा निवडणूक आली की सागर मेघे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असतेच. कारण मेघे कुटुंबातील व्यक्ती उमेदवार झाल्यास अनेक अर्थाने निवडणूक रंगतदार होत असल्याचा जिल्ह्याचा अनुभव राहला. आता मेघे यांचे पुतणे डॉ उदय यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत यायला लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मेघे कुटुंबाचे नाव हद्दपार होणे शक्य नसल्याची खात्री सर्वपक्षीय राजकीय नेते देत असतात.