वर्धा : दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक मतदान झाले. नागपुरात कमी मतदान झाल्यावर वर्ध्यात ही चूक करू नका, असे आवाहन करणारी पोस्ट सोशल मीडियावर झळकली होती. ही पोस्ट एका कट्टर भाजप प्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचित नेत्याची होती. त्यास प्रतिसाद होतं कां, असे गंमतीत विचारल्या जाते. मात्र साडे तीन टक्क्याने २०१९ पेक्षा अधिक मतदान वाढले. हे वाढीव मतदान चांगलेच चर्चेत आहे. हा उत्साह आमच्याच साठी असे अमर काळे व रामदास तडस समर्थक म्हणत आहे. पण काळे यांच्या तुतारी चिन्हाचा बोलबाला सूरू झाला अन तडस समर्थक बॅक फूट वर गेल्याचे पाहायला मिळाले.
किमान दहा हजार मतांनी तरी आमचे तडस बाजी मारतील अशी सावध टिपणी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार मुदतीपूर्वी तीन मिनिटात संपलेल्या जाहीर सभेस उपस्थित मोदी समर्थक काही पत्रकारांच्या उपस्थितीत स्पष्ट बोलून गेले होते. असे कां विचारल्यावर ते म्हणाले की यावेळी लढत पहेलवान विरुद्ध आघाडी अशी नसून विश्वगुरू विरुद्ध इतर सर्व अशी असल्याने थोडी शंका आहे. मात्र मोदी याच नावाने विजय मिळणार अशी खात्री त्यांनी दिली. तर काळे समर्थक ही जनतेची लढाई मानतात. त्यामुळे काळेच नव्हे तर अन्य उमेदवार असता तरी फाईट असतीच. चिन्ह नवे, पक्ष नवा, संघटना बांधणी नाही. मात्र तरीही भाजप विजयाचा छाती ठोक दावा न करता सीट निघून जाईल, असे म्हणत आहे. यातच पावले, असे इंडिया आघाडीचे कार्यकर्ते बोलतात. खुद्द रामदास तडस म्हणतात की ८० हजार ते एक लाखाने विजयी होणार. तर अमर काळे पण खात्री देत आहे की ८० हजार ते एक लाख मतधिक्याने विजयी होणार. हा असा आकडा ते दोघे कां देतात याचे विश्लेषण मात्र मिळत नाही.
हेही वाचा : मतांचा वाढीव टक्का, कुणाला धक्का ? आकडेवारीवरुन जय-पराजयाचे फड…
भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावर, प्रताप अडसड हे चौघेही तडस यांना माझेच क्षेत्र लीड देणार म्हणून दावा करतात. पण प्रत्यक्षात पत्रकार चमुने पाहणी दौरा केला तेव्हा दुपारी तीन नंतर भाजपचे बूथ बंद पडलेले दिसून आले. तसेच पक्षाच्या कार्यालयात मतदान चिठ्याचे मुंबईतून आलेले गट्ठे आहे तसेच पडून असल्याचे फोटो झळकले. पण ही मोठी चूक नसून मोदी हे चलणी नाणे असल्याचा दावा करीत भाजप समर्थक आश्वस्त आहेत.