वर्धा : महायुतीप्रमाणेच महाआघाडीतसुद्धा जागा वाटपाचा घोळ सुरूच असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी कोणता मतदारसंघ कोण लढणार, हे सध्या तरी अनिश्चित असल्याचे चित्र आहे. मात्र वर्धा मतदारसंघ काँग्रेसने गमावला व मित्रपक्षाने लाटला, अशा चर्चेने अस्वस्थ काँग्रेसजन आता दिल्लीत पोहचले आहे. ही वर्धेसाठी निकराची लढाई असल्याचे हे नेते सांगत आहे. माजी आमदार अमर काळे व नरेश ठाकरे, तसेच चारूलता टोकस, शेखर शेंडे, शैलेश अग्रवाल व अन्य वर्धेसाठी किल्ला लढवीत आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांची भेट घेतली.
जागावाटप निश्चित झालेले नाहीच. कोणत्याच जागेबाबत मित्र पक्षाला अंतिम शब्द दिलेला नाही. इथेच ठरेलं, अशी ग्वाही वासनिक यांनी दिल्याचे शेंडे म्हणाले. आज पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या माध्यमातून आमच्या मार्गदर्शक सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करू, गांधी परिवार सेवाग्राम, पवनारबाबत संवेदनशील असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या कानावर आमच्या भावना टाकण्याचा प्रयत्न करू, असे शेंडे म्हणाले. तर टोकस यांनी सांगितले की, वर्धेची जागा सोडल्याची बाब वासनिक यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. अद्याप काहीच निश्चित झालेले नसल्याचे उत्तर मिळाले, असे टोकस म्हणाल्या. त्या सोबतच अविनाश पांडे व अलका लांबा यांनाही आम्ही वर्धेसाठी आग्रही असल्याचे कळविले. पुढील एक दोन दिवसात चांगली बातमी कळेल, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा…बुलढाणा: आघाडीच्या बैठकीला ‘वंचित’ची दांडी; उमेदवार अनिश्चित पण विजयाचा निर्धार
काँग्रेस कडून ही जागा जाणार अशी चर्चा जोर धरू लागल्यावरच जिल्ह्यातील काँग्रेस नेते जागे झाल्याची बाब उपहासाने आता बोलल्या जाते. हे प्रयत्न आधीच झाले असते तर ही वेळ आली नसती, अशीही प्रतिक्रिया उमटते. जागा जाणार म्हणून शैलेश अग्रवाल यांनी सर्वप्रथम हालचाली सूरू केल्याचे लपून नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी इतरांना मी स्वतः खर्च करून लढतो, उमेदवार नाहीच असा मेसेज जाऊ देऊ नका, असे इतर नेत्यांना सुचविले होते. त्यानंतर अमर काळे यांनी पण पक्षाने आदेश दिल्यास लढू, असा सूर व्यक्त केला.