नम्रपणे वागा, वाद करू नका, पडते घ्या, येणारे पाहुणे व आपण यजमान, अशा शब्दांत सर्व समिती सदस्यांना मार्गदर्शनपर बोधामृत पाजण्यात आले. समितीच्या सर्व सदस्यांची एक अंतिम आढावा बैठक संमेलनस्थळी पार पडली. कार्यवाह प्रदीप दाते तसेच डॉ. उदय मेघे, महेश मोकलकर, संजय इंगळे तिगावकर, हाशम शेख यांनी विविध सूचना केल्या.
संमेलन प्रत्येकासाठी खुले आहे. मात्र, जेवण व नाश्टासाठी पैसे मोजावे लागतील, ही बाब आवर्जून सांगण्याचे सर्वांना स्पष्ट करण्यात आले. सदस्य, प्रतिनिधी, स्वयंसेवक तसेच प्रमुख समिती पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या रंगाचे ओळखपत्र देण्यात येत आहे. आपल्या गैर वागण्याची चर्चा होऊ नये, तशी काळजी घ्यावी. पाहुण्यांना अडचण आल्यास ती स्वतः किंवा संबंधित समिती प्रमुखास सांगून सोडवावी, अशा व अन्य सूचना करण्यात आल्या. आज सायंकाळी सत्यपाल महाराज यांचे खंजिरी भजन होणार. तर, उद्या २ फेब्रुवारीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कृत सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता होईल. संमेलनाचे प्रवेशद्वार तयार होत असून त्याची उभारणी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.