वर्धा : एखाद्या प्रोजेक्टबाबत जनता संवेदनशील झाले की लोकप्रतिनिधी किती घायकुतीस येतात याचे उदाहरण म्हणून हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे देता येईल. नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये राज्यात सुरू करण्याची घोषणा शासनाने केली तेव्हा वर्धा जिल्हा त्यात होता. वर्धा शहरलागत सातोडा येथे जागा नमूद करीत शासनाने घोषणा केली तेव्हा प्रथम विरोधात आवाज हिंगणघाटवासियांचा उमतला. संघर्ष समिती घोषित करीत जनता कामाला लागली. २६५ दिवस आंदोलन चालले. प्रथम आमदार समीर कुणावार यांनी काहीच मत व्यक्त केले नव्हते. पण जेव्हा लोकं आमदार झोपले काय, असे जाहीर विचारू लागले तेव्हा कुणावार हे पण कामास लागले. प्रश्न आमदारकीवर उठणार, हे लक्षात येताच कुणावार यांनी महाविद्यालय हिंगणघाट येथे देणार नसाल तर माझ्या आमदारकीचा राजीनामा घ्या, असा ईशारा देऊन टाकला. आक्रमक असलेल्या भाजप विरोधकांना श्रेय जाण्यापेक्षा कुणावार यांच्या भूमिकेस श्रेय देणे बरे, अशी भूमिका सत्ताधारी मंडळींनी घेतल्याची चर्चा हे महाविद्यालय हिंगणघाट येथे जाहीर झाल्यावर झाली. आता जागेचा तिढा आहेच. कुणावार यांचा संबंध जोडत दान दिलेली जागा विरोधक अतुल वांदिले, संघर्ष समिती व राष्ट्रवादीने घेतली. ती दात्याने मग व्यथित होत परत घेतली.
हेही वाचा : २१ वैद्यकीय महाविद्यालयांत २४४ कोटींच्या खर्चातून ‘डिजिटल फिजियोलॉजी प्रयोगशाळा’, हा लाभ होणार ..
विरोधक हे महाविद्यालय शासकीय जागेवरच व्हावे म्हणून आग्रही आहे. त्यावर आता आमदार कुणावार पण सहमत झाले. विरोधकांनी खाजगी जागेची बाब आपल्या व्यक्तिगत फायद्याशी जोडल्याने हि बाब चांगलीच अंगलट येवू शकते, हे चाणक्ष कुणावार यांनी हेरली. दोन पावले ते मागे आले आहेत. लोकसत्ताशी बोलतांना ते म्हणाले की शासकीय जागेवरच हे वैद्यकीय महाविद्यालय होणार. तश्या जागेचा शोध सूरू झाला आहे. उदया सोमवारी मुंबईत वैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक आहे. अधिवेशन आटोपले पण मी मुंबईतच थांबून आहे. जागेची निवड लवकर व्हावी हा माझा प्रयत्न आहे. काही जागा आहे पण त्यात झूडपी जंगल आहे. ते सोडवून घेण्याची बाब केंद्राच्या अख्त्यारीत येते. तो प्रश्न लवकर सुटणारा नाही. म्हणून कसलीच अडचण नसणारी जागा जिल्हा प्रशासनाने सुचविली पाहिजे. अंतर ही महत्वाची बाब नाही. महाविद्यालय होणे हे महत्वाचे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा प्रश्न सुटावा, असा माझा प्रयत्न आहे, असे आमदार कुणावार यांनी प्रथमच स्पष्ट केले. एकूणच या प्रकरणात विरोधकांनी केलेले आरोप व सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने आलेली जबाबदारी या कोंडीत कुणावार काय मार्ग काढणार, हे सोमवारीच समजेल.