वर्धा : सध्या कठोर शिस्तीचे नेतृत्व असल्याने उघड विरोधात बोलण्याची भाजपामध्ये कोणाची बिशाद नाही. मात्र आर्वी येथील भाजपाचे आमदार दादाराव केचे यांनी पक्षाच्या कर्नाटकातील पराभवाची कोणतीच तमा न बाळगता स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, ज्यांनी प्रामाणिकपणे कामे केलीत, अनेक वर्षांपासून पक्ष उभा केला, अशा लोकांना डावलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ज्यांनी पक्ष उभा केला त्यांच्याऐवजी उपऱ्यांना प्राधान्य दिले. यातून पक्षाने बोध घेतला पाहिजे.
केचे यांनी मनातील खदखद अशी जाहीरपणे व्यक्त करण्यामागे एक कारण दिल्या जाते. आर्वी मतदारसंघात हवापालट करण्याचा भाजपा श्रेष्ठींचा मनसुबा असल्याची जोरदार चर्चा आहे. गतवेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सचिव सुधीर दिवे यांनी उपक्रमाचा धुरळा उडवून देत विधानसभा निवडणुकीसाठी दावेदारी केली होती. मात्र केचे पक्के झाले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव सुमित वानखेडे यांना उमेदवारी मिळणार म्हणून चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा – नागपूर : ‘सुपर’मधील उद्वाहन बंद.. रुग्णांनी जिन्याने जायचे काय?
वानखेडे यांनी विकास योजनांची कोटी कोटी उड्डाणे या क्षेत्रात घेतली. लोकं आमदार केचे यांच्या ऐवजी वानखेडे यांच्याकडे जाण्यास प्राधान्य देवू लागल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे केचे गट चांगलाच अस्वस्थ झाला आहे. उमेदवार बदलल्यास बंडखोरी अटळ, असे बोलल्या जाते. त्याचीच चुणूक केचे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत दिसत आहे. कर्नाटक पराभवावर असे स्पष्ट बोलणारे ते राज्यातील पहिलेच भाजपा नेते असावेत.