वर्धा : यजमानाकडे जातांना काही भेट घेवून जायचा प्रघात पाळल्या जातो. विदेशात जायचे तर हमखास आपल्या गावाची ओळख म्हणून काही भेट देणे आलेच. सध्या इंग्लंड येथील वेल्सच्या दौऱ्यावर महाराष्ट्रातील तेरा आमदार अभ्यास दौऱ्यानिमित्त गेले आहेत. वेल्स राज्याची राजधानी कार्डफ शहरात हे आमदार आहेत. या राज्याच्या संसदेस भेट देणे झाले. संसद सदस्य एलून डव्हिस यांची भेट घेण्यात आली. या वेळी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक व जिल्ह्याची ओळख असलेला गांधी चरखा डव्हिस यांना भेट दिला. तसेच गांधी वास्तव्य व त्या दरम्यान झालेल्या ऐतिहासिक घडामोडींना उजाळा दिला.
हेही वाचा : “पूर्वजांचा अशांत आत्मा भटकत असून…”, भूतबाधेची भीती दाखवून महिलेला लुटले; दोघांना अटक
सेवाग्राम आश्रम हे एक प्रेरणादायी स्थळ म्हणून जगभरात ओळखले जाते. या ठिकाणी भेट द्यावी, अशी विनंती त्यांना केल्याचे भोयर म्हणाले. या भेटीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयकुमार रावल, मिहिर कोटेचा, झिशन सिद्दीकी, अमीन पटेल, अमित साटम, रईस शेख, सत्यजित तांबे, अमित झनक, असलम शेख, मंगेश चव्हाण उपस्थित होते. सुशासन व लोककल्याण यात शिक्षणाचे महत्व आणि जगापुढील आव्हाने या अनुषंगाने अभ्यास होणार आहे.