वर्धा : गत दोन वर्षांपासून आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विविध कामांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यास अखेर यश आले असून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजपची सत्ता वर्धा नगर परिषदेत गत पाच वर्षांत होती. यावेळी भूमिगत गटरची योजना मंजूर झाली. धडाक्यात कामे काढण्यात आली. शहरातील अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले होते. खुद्द भाजपा आमदार डॉ. पंकज भोयर यांनी ठिकठिकाणी पाहणी करीत वरिष्ठ अधिकारी तसेच पक्षाच्या नेत्यांना हे प्रकरण अंगलट येवू शकते म्हणून अवगत केले होते.
खोदकाम झालेल्या रस्त्यावर अनेक अपघात झाले. आताही नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्तीची मागणी सातत्याने होत होती. अखेर हे काम पक्षासाठी मारक ठरू नये म्हणून आमदार कामास लागले. त्यासाठी आता दहा कोटी रुपये खर्चून सतरा रस्त्यांची कामे केल्या जातील.
हेही वाचा – ‘भारत छोडो’ आंदोलनाची आठवण; ते म्हणाले, ”भारत माता की जय म्हणताच…”
तसेच काही सिमेंट रस्ते व नाली बांधकाम होणार आहे. मोठा शहरी मार्ग असलेल्या पँथर ते जसवंत चौक मार्गाचे दोन कोटी रुपये खर्चून सिमेंटीकरण केल्या जाणार आहे. तेवढाच खर्च सेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गासाठी मंजूर झाला आहे. क्रिडासंकूल परिसरात विद्यूत रोषणाई व जलतरण तलावाचे
आधुनिकीकरण केल्या जाईल. त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे या परिसरात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हेमंत करकरे स्मृती वाचनालय डिजिटल होणार. शहरातील विविध उद्यानांच्या विकासासाठी पाच कोटी रुपये तर ग्रीन जीम पार्कसाठी एक कोटी रुपये प्राप्त झाले आहे. या सर्व कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे डॉ. भाेयर यांनी सांगितले.
या प्रस्तावित कामांपैकी त्यांनी काही कामांची पाहणी पालिका अधिकारी तसेच भाजपा नेते जयंत कावळे, प्रशांत बुरले, पवन राऊत, वंदना भुते,जगदीश टावरी, निलेश किटे, कमल कुलधरीया व अन्य नेत्यांसह केली.