वर्धा : केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामे वर्धा जिल्ह्यात सुरू आहेत. त्यात विलंब होत असल्याने ही रखडलेली कामे जनतेस मनस्ताप देणारी ठरत आहेत. त्या रोषास खासदार रामदास तडस यांना सामोरे जावे लागले. म्हणून त्यांनी तडकाफडकी बांधकाम व अन्य संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाची बैठक घेतली.
नेहमी शांत आवाजात व समजुतीच्या सुरात बोलणारे खासदार यावेळी मात्र भडकले. बजाज चौक व सिंदी उड्डाण पुलाचे काम संथ गतीने होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुठल्याही परिस्थितीत ही कामे त्वरित पूर्ण करा. होत नसेल तर तसे सांगा. मला त्यावर उपाय करण्यास भाग पाडू नका. प्रत्येकवेळी प्रगतीपथावर काम असल्याचे उत्तर देता, हे बरोबर नाही. २०१६ मध्ये मंजुरी मिळालेले काम अद्याप पूर्ण होत नाही, हा काय प्रकार आहे, असे खासदारांनी खडसावले.
हेही वाचा – भाजपामध्ये येणार नाही असे जाहीर करा! मुनगंटीवारांचे वडेट्टीवार यांना आव्हान
माना खाली टाकून अधिकारी शांत बसल्याचे दिसून आले. तेव्हा तुमची काय अडचण आहे ते मला सांगा, असे तडस यांनी सुचविले. केंद्राची काही परवानगी हवी असेल तर मला सांगा. मी दूर करतो. मात्र यापुढे कारणे सांगत बसू नका, असे ते निक्षून म्हणाले. जनतेचा विचार आम्हाला करावा लागतो. म्हणून मंजूर कामे तातडीने पूर्ण झाल्याचे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा तडस यांनी व्यक्त करीत सभा गुंडाळली.