वर्धा : वर्धा नगर परिषदेच्या वार्षिक कर आकारणी प्रक्रियेस अखेर राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. अत्यंत वादग्रस्त आणि तेवढाच चर्चेत असलेल्या विषयाला बुधवारी सायंकाळी अखेर विराम मिळाला. नगर परिषदेने २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरू केली होती. कर निर्धारण मात्र चांगलेच वादग्रस्त ठरले होते. सध्या प्रशासक असल्याने करवाढ प्रक्रिया सुरू केल्याच जाऊ शकत नाही, असे आक्षेप विविध पक्षांनी घेतले होते. लोकांची तीव्र भावना लक्षात घेत आमदार डॉ. पंकज भाेयर यांनी हे प्रकरण मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे उपस्थित केले होते.
त्याची दखल घेत नगर विकास विभागाने या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. अपील समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे नागरिकांना कर वाढीवर आक्षेप घेता येणार नसल्याने नगर परिषदेची निवडणूक होवून निवडून आलेली अपील समिती स्थापन होईपर्यंत प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे. हे प्रकरण वर्धा शहरात चांगलेच गाजत होते. त्यातच पालिका प्रशासनाने करवाढीविरोधात आक्षेपांचे अर्ज घेणे सुरू केले होते. आमदारांनी खात्री देवूनही अर्ज घेणे सुरू झाल्याने स्थगिती मिळणार की नाही, अशी शंका घेणे सुरू झाले होते. आता मात्र ही प्रक्रिया थांबलेली आहे.