वर्धा : खासगी इंग्रजी शाळांचे सर्वत्र पीक आल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. अगदी तालुकापातळीवर अशा शाळा मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मात्र शाळा सुरू करण्यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागतात. त्याचे निकष पूर्ण करावे लागतात. पण निकष पूर्ण न करणाऱ्या शाळा शासनलेखी अनधिकृत ठरतात. अनेक शाळा वर्षानुवर्षांपासून सुरू असूनही काही मान्यता न घेतल्याने या शाळा अनधिकृत ठरविण्याची कारवाई माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. त्यांना अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. मात्र वेळेत तसे न केल्याने नोटीस बजाविण्यात आल्या. या शाळांमध्ये नामवंत शाळांचाही समावेश आहे.
येथील विख्यात लॉईड्स विद्या निकेतन भुगाव, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल पवनार, अग्रगामी कॉनव्हेंट म्हसाळा, सेंट ॲन्थोनी नॅशनल स्कूल सिव्हीललाईन, संत चावरा स्कूल सालोड, अल्फांसो हायस्कूल सावंगी मेघे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नागठाना, सक्षम स्कूल, न्यू इंग्लिश ॲकेडमी ऑफ जिनियस महादेवपुरा व वर्धा तालुक्यातील अन्य शाळा आहे.
समुद्रपूर तालुक्यातील माउंट कार्मेल, इनोव्हेटीव माईड्स स्कूल व एक्सलन्स इंग्रजी शाळा तळेगाव, सेंटमेरी स्कूल कवठा, सेंट जॉन हायस्कूल नांदगाव रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट, भारतीय विद्या भवन्स हिंगणघाट, मोहता विद्या मंदिर नांदगाव रोड, माउंट कार्मेल इंग्लिस स्कूल अडगाव, एआरसी पब्लीक स्कूल नारा रोड व अन्य शाळांना नोटीस बजाविण्यात आली आहे. यापैकी काही शाळांना शासनमान्यता व दर्जावाढ मान्यता नाही. तसेच नाहरकत प्रमाणपत्र अद्यावत करण्यात आलेले नाही.
काही शाळांना सीबीएसई, आयसीएसई व तत्सम मंडळाचे संलग्नता प्रमाणपत्र नाही. शिक्षणाधिकारी कार्यालयाने या शाळांना शासन मान्यतापत्र जमा करण्याबाबत अंतिम संधी दिली होती. पण तरीही ती जमा केल्या गेली नाही. सदर शाळांना अनधिकृत घोषित करून शाळा बंद करण्याबाबतचे फलक शाळेच्या दर्शनी भागात लावावे व शाळा बंद करण्याबाबतची कारवाई करून तात्काळ अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश सर्व तालुक्यातील गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाने याबाबत निर्देश दिले होते.
हेही वाचा – ashadhi ekadashi 2024 : ‘शेगावी आलो तुझ्या दर्शनाला…’, आषाढीनिमित्त संतनगरी फुलली
गट शिक्षणाधिकाऱ्याने तालुक्यातील एकही अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची सूचना आहे. शिक्षणाधिकारी मनिषा भडंग या संदर्भात बोलताना म्हणाल्या की, या शाळांना कागदपत्रे सादर करण्याची सूचना पूर्वीच करण्यात आली आहे. मात्र सादर झाली नाही. शाळा बंद करण्यापूर्वी ही नोटीस गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित शाळांना देण्यात येणार. परत एकदा संधी देवू. अन्यथा कारवाई केल्या जाणार, असे त्यांनी स्पष्ट केले.