वर्धा : सोमवारपासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार झाले. त्याऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अंमलात येणार. यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदविण्यापासून ते त्यांचा तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितानुसार राबविल्या जाईल. नव्या कायद्यात तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे. ३० जूनच्या मध्यरात्री बारानंतर घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद नवीन कायद्यानुसार करावी, असे आदेश आलेत.

जिल्ह्यात या नव्या कायद्यानुसार एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवाग्राम पोलीस ठाण्यात कार्यरत आशिष रमेश डफ यांची अल्लीपूर येथे वडिलोपार्जित शेती आहे. त्यावर एका नातलगाने दावा केला. न्यायालयाने नातलगाच्या बाजूने निवाडा दिल्यानंतर ही शेती विकण्याचा त्याने निर्णय घेतला. तेव्हा आशिष डफ यांच्या वडिलांनी ती शेती बाजारभावाने स्वतःच खरेदी करण्याची तयारी दर्शविली.सौदाही झाला पण तो रद्द करीत नातलगाने दुसऱ्यास ती शेती विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आशिष डफ यांनी मित्राचा सल्ला घेत अ‍ॅड. सचिन सोनोने यांची भेट घेतली. त्यावर वकील सोनोने यांनी वडिलोपार्जित शेती विकत घेण्याचा पहिला अधिकार वारसदाराचा असल्याचा सल्ला दिला. हे प्रकरण न्यायालयात दाखल केल्यास आपणच जिंकू, असं विश्वास पण दिला. संबंधित नातलगास लगेच नोटीस देण्यात आली. फीचे वीस हजार रुपये घेतले. शेतीचे मूल्यांकन करीत खरेदीचा व्यवहार करण्यासाठी अनामत रक्कम जमा करावी लागेल, असे वकिलांनी सांगितले. त्यावर विश्वास ठेवत आशिष डफ यांनी वकिलास २८ लाख रुपये दिले. न्यायालयाचे नाव व शिक्का असलेली पावतीसुद्धा वकिलाने दिली. पण ती संशयस्पद वाटल्याने डफ यांनी त्यांच्या न्यायालयातील एका मित्रास याबाबत विचारणा केली. तेव्हा ही पावती बनावट असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – अमरावती : ‘जलयुक्त’ला हवे ‘निधी सिंचन’, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेलाच निधीची चणचण; योजना झाली…

हेही वाचा – तर ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ  मिळणार नाही

दिलेले पैसे न्यायालयात जमाच केले नसल्याचे आढळून आल्याने डफ यांना धोका झाल्याचे लक्षात आले. लगेच त्यांनी वर्धा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवर वरिष्ठाचा सल्ला घेत शहर पोलिसांनी नव्या कायद्यानुसार गुन्हे दाखल केलेत. जुन्या दंड संहितेनुसार ४२०, ४६८, ४६६, ४६७ व ४७१ ऐवजी नव्या संहितेनुसार ३१८ (४), ३३६, ३३७, ३३८ व ३४० (२) या कलमाखाली वकिलावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.