लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : कर्जाचे आमिष देत बेरोजगारांना फसविणाऱ्या दिल्लीच्या ठगांना अटक करण्यात वर्धा पोलीसांना यश आले आहे. दिल्लीत बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून हा गोरखधंदा उजेडात आणण्यात आला आहे. या प्रकरणी वर्धेच्या एका युवतीने तक्रार केली होती.

१ जूनला सदर युवतीने आपल्या आईच्या मोबाईलवर रोजगारविषयक संकेतस्थळ उघडून पाहले. त्यात असलेला अर्ज भरला. ८ जूनला एका मोबाईलवरून एका व्यक्तीने तुम्ही एअर इंडियाच्या नोकरीसाठी भरलेला अर्ज मंजूर झाला असून तुमची निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर वारंवार सदर युवतीशी वेगवेगळ्या पाच मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत विविध शुल्क भरण्यासाठी रक्कमेची मागणी केली. विक्रम मल्होत्रा यांच्या आईडीवर शेवटी सदर युवतीने ८९ हजार ५०० रूपये पाठविले. मात्र ही फसवणूक असल्याचे त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली.

आणखी वाचा-परीक्षेत स्वतःच्या जागी दुसऱ्याला बसवले, आता सक्‍तमजुरी…

पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी त्यासाठी विशेष चमू गठीत केली. नोकरीचे आमीष देत लुबाडणाऱ्या टोळीचे पाळेमुळे शोधून काढण्याचा चंग बांधला. तांत्रिक माहितीच्या आधारे हा गुन्हा हरियाणातील फरिदाबाद व दिल्लीतील बदरपूर या भागात घडल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरिक्षक सिनूकुमार बानोत तसेच कुलदीप टाकसाळे, निलेश तेलरांधे, अमित शुक्ला, अनुप कावळे यांची चमू दिल्लीला रवाना झाली. त्यांनी सात दिवसात तपास केल्यानंतर विक्रम मल्होत्रा हा ईसम अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. नंतर परत फरिदाबाद व बदरपूर येथे तपास करण्यात आला. तेव्हा बदरपूर परिसरात एका दुमजली ईमारतीत ईझीगो कंपनीच्या कार्यालयात अनेक महिला व पुरूष आढळून आले. ते विविध ठिकाणी कर्ज, नोकरी तसेच विविध कारणांसाठी फोनवरून आमीष देत असल्याचे दिसले. तिथे छापा टाकल्यावर २६ मोबाईल व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. फसवणूक करण्यासाठी लोकांशी कसे बोलायचे याची नोंद असलेले रजिस्टर मिळाले.

आणखी वाचा-तोतया ‘सीआरपीएफ’ अधिकारी गजाआड; बनावट फेसबुक अकउंटद्वारे कशी फसवणूक करायचा? जाणून घ्या…

आकाश सुभाष सहानी व राकेश रामप्रकाश राजपूत यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच घटनास्थळी काम करणाऱ्या सात महिलांना तपासासाठी हजर राहण्याची नोटिस बजावण्यात आली.पोलीस निरीक्षक कांचन पांडे,संदीप का यांच्या निर्देशनुसार दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, कुलदीप टाकसाळे, मीना कोरोती, विशाल मडावी,अनुप कावळे,अक्षय राऊत,गोविंद मुडे,अंकित जीभे,स्मिता महाजन,वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रणजीत जाधव,अनुप राऊत, अमित शुक्ला, लेखा राठोड,प्रतीक वांदिले यांच्या चमूने ही कारवाई फत्ते केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha police arrested thugs gang from delhi pmd 64 mrj