वर्धा: नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. त्यातच मार्च हा रमझान व विविध हिंदू धार्मिक उपक्रम साजरा करण्याचा महिना. नागपुरात दंगल घडली आणि त्यानंतर शासनाने कडक उपाय योजले. आता नागपुरात दंगलीस प्रोत्साहन करणाऱ्या विविध गुन्हेगारांवार कारवाई सूरू झाली आहे. आरोपी असून फरार झालेल्या संशयित व्यक्तीचे अतिक्रमण असलेले बांधकाम पाडल्या जात आहे.

नागपूरच्या कारवाईचे इतरत्र पडसाद उमटू शकतात. हा धार्मिक भावनांचा उद्रेक ठरू नये म्हणून काळजी घेतल्या जात आहे.निर्माण फॉउंडेशनचे अमीर अली अजानी म्हणतात की रमजानच्या महिन्यात काही विशिष्ट शक्ती भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण महाराष्ट्र हा देशात सर्वधर्मसमभाव याभावनेने जगणारा प्रदेश आहे. वेगळी ओळख असल्याने प्रत्येक धर्माचा व्यक्ती तो ओळख जपण्याचा प्रयत्न करतो. रमजान उत्सवास अवघे दहा दिवस बाकी आहे. शहरात शांततेत पवित्र उत्सव साजरा होत आहे. पण काही विघातक इलेमेंट प्रत्येक समाजात असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्या पाहिजे. मी स्वतः अनुचित व भावना भडकवीणारे संदेश प्रसारित होवू नये म्हणून आवाहन केले आहे. शांतता हाच जगण्याचा मार्ग आहे, असे अजानी म्हणाले.

पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी स्पष्ट केले की आमचा जिल्हा शांत असून कुठेच काही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्वास आहे. जिल्ह्यात हिंगणघाट, वर्धा व अन्य भागात रामकथा वाचन, प्रवचन, भजन उत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम आहेत.ईथे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दक्ष आहेत. यंत्रणा खबरदार आहेत. उत्सवाच्या काही ठिकाणी स्थानिक पोलीस साध्या वेशात तैनात असल्याची माहिती मिळाली.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे नेते अनुप जयस्वाल म्हणाले की नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर विशेष बैठक किंवा आम्हास पोलीस खात्याकडून काहीच सूचना आली नाही. आगामी एप्रिल महिन्यात विविध धार्मिक उत्सव आहेत. ते शांततेत पार पडतील, ही अपेक्षा. नागपूर दंगलीत दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, असे निवेदन आम्ही दिले आहे. मुख्यमंत्री यांच्या गृह शहरात एव्हढी मोठी घटना ही सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरते. गरज पडल्यास उत्तर प्रदेश सरकारचा बुलडोझर उपाय अंमलात आणावा, असे अनुप जयस्वाल निवेदनातून स्पष्ट करतात.