वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पावित्र्य टिकावे म्हणून पोलिसांनी छेडलेल्या ‘वॉश आऊट’ मोहिमेत दैनंदिन लाखो रुपयांची दारू पकडल्या जात आहे. गेल्या चारच दिवसात ३५ लाख रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे रुजू झाल्यापासून अवैध दारू विक्रेत्यांना पळता भुई थोडी झाली आहे. त्यातच संमेलनाचा बिगुल वाजल्यानंतर तर मोहिमेने वेगच पकडला. संमेलन नगरी असलेल्या रामनगर परिसरात तर ठिकठिकाणी दारूचे गुत्ते तसेच किरकोळ दारू विक्रेत्यांची भरमार आहे. त्यामुळे रामनगर पोलिसांना मोठे आव्हान आहे. त्यांच्या दिवसरात्र चाललेल्या गस्तीत देशी विदेशी दारूचा साठा हाती लागत आहे. परिणामी संमेलन तळीरामांची रात्र बैचेन करणारे ठरत असल्याने ते यास कोसत असल्याचे दिसून येते. वर्धेकडे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवल्या जात आहे. दारू विक्रीमुळे सुव्यवस्थेचा प्रश्नही उदभवतो, म्हणून विशेष नजर या काळात ठेवल्या जात असल्याचे एका पोलीस निरीक्षकाने नमूद केले. यावर, गांधी जिल्ह्यात दारूबंदी आहे हे पाहुण्यांना दिसून येईल, अशी मिश्किल टिपणी एकाने केली.