वर्धा : सध्या सर्वाधिक दुःख कश्याचे होत असेल तर ते मोबाईल चोरीस गेल्याचे किंवा हरवल्याचे. जवळचा सोडून गेला म्हणून होणाऱ्या विरहा पेक्षा याचा विरह अधिकच. म्हणून पोलीस तक्रार केल्यावर आतुरतेने वारंवार चौकशी केल्या जाते. कारण त्यात असलेला डेटा ही मोठी पुंजी समजल्या जाते. म्हणूनच वर्धा पोलिसांनी चोरीस गेलेले मोबाईल शोधून आणत ते एका कार्यक्रमात मूळ मालकास परत केले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे चित्र होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा जिल्हा पोलिसांकडे या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ५६८ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यासाठी विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात, राज्यात व राज्याबाहेर तांत्रिक माहिती आधारे तपास करण्यात आला. त्यात २२२ मोबाईल संच हाती लागले. त्याची किंमत ३३ लाख २९ हजार रुपये इतकी भरली. महागडे मोबाईल व त्यातील तेवढीच मोलाची माहिती हाती पडली. हे संच परत करण्यासाठी नियोजन भवनात कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर अधीक्षक डॉ. सागर कवडे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात मोबाईल संच चोरीस गेल्याची तक्रार करणाऱ्यापैकी १३४ मोबाईल मालक उपस्थित होते. त्यांनी केलेली तक्रार, मोबाईलची माहिती व अन्य बाबींची खातरजमा करीत मोबाईल परत करण्यात आले.

हेही वाचा…आयारामांमुळे काँग्रेस निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; चंद्रपूर जिल्ह्यातील चित्र

तसेच उर्वरित मोबाईल सायबर सेलमधून परत दिल्या जाणार आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण, प्रमोद मकेश्वर, देवराव खंडेराव, रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी तसेच सायबर सेलचे दिनेश बोथकर, मीना कौरथी, विशाल मडावी, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अंकित जिभे व प्रतीक वांदिले यांनी ही कारवाई फत्ते केली. आपला मोबाईल परत मिळाला म्हणून सर्वांनी तिथेच आनंद व्यक्त केला. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून धन्यवाद पण दिले. जणू आयुष्यभराची पुंजी परत गवसली.

हेही वाचा…वर्धा : चहा, नाश्त्याच्या नावे शासकीय तिजोरीवर डल्ला, गुन्हा दाखल होताच आरोपी अधिकाऱ्याची…

मोबाईल हरविल्यास किंवा चोरीस गेल्यास नागरिकांनी तत्परतेने त्याची तक्रार करावी. ही तक्रार पोलीस खात्याच्या संकेतस्थलावर किंवा राज्य शासनाच्या ‘ सीईआयआर ‘ या पोर्टलवर करता येईल. तक्रार करण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून यावेळी करण्यात आले. महागडा मोबाईल संच पाहून त्यावर हात साफ करण्याचा प्रकार प्रामुख्याने प्रवासात होत असल्याचे आढळून आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha police recover and return 222 stolen mobile phones worth rupees 33 lakh bringing relief to owners pmd 64 psg