वर्धा : येथील सुप्रसिद्ध श्री संत गजानन महाराज देवस्थानातील दागिने अखेर परत मिळाले आहे. आज सायंकाळी देवस्थान समितीच्या पार पडलेल्या सभेत दागिने व्यवहार करण्याची जबाबदारी घेणारे, मात्र त्याचा हिशेब न देणारे देवस्थान पदाधिकारी शालिग्राम तिबडीवाल यांची संस्थेतून हाकालपट्टी करण्याचा ठराव घेण्यात आला. हा ठराव पदाधिकारी असलेले सुपरिचित उद्योजक प्रवीण हिवरे यांनी मांडला. त्यास आध्यात्मिक प्रवचनकार डॉ. नारायण निकम यांनी दुजोरा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजानन महाराज मंदिरातील जुने दागिने विकून त्या मोबदल्यात महाराजांच्या मूर्तीसाठी चांदीचा टोप तयार करण्याचे ठरले. ही जबाबदारी एक विश्वस्त असलेले कथित व्यापारी शालिग्राम तिबडीवाल यांनी स्वीकारली. मात्र तीन वर्षे लोटूनही टोप आलाच नाही. म्हणून मग चांदीचे काय झाले, याची चर्चा भाविक करू लागले. याबाबत ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने २४ फेब्रुवारीला आणि दै. लोकसत्ताने २५ फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित केले. शहरभर चर्चा झाल्याने आता पुढे काय, असा प्रश्न विश्वस्त मंडळीस विचारल्या जाऊ लागला. तेव्हा डॉ. नारायण निकम यांनी तीन दिवसात दागिने परत अथवा पोलीस तक्रार अशी रोखठोक भूमिका घेतली. शेवटी आज ४ मार्चला कार्यकारिणी सभा बोलावण्याचे ठरले. यात अध्यक्ष मोहन अग्रवाल तसेच विश्वस्त डॉ. निकम, प्रवीण हिवरे, शेखर शेंडे, नाना पहाडे, सुशील व्यास व अन्य उपस्थित होते.

यावेळी कोषध्यक्ष व्यास यांनी तिबडीवाल यांनी १ किलो ९७० ग्रॅम चांदी माझ्याकडे आणून दिली आहे, असे नमूद करीत सभेत ही चांदीची भांडी जमा केली. सर्वांच्या साक्षीने ती देवस्थान तिजोरीत जमा करण्यात आली. चांदी परत मिळाली, पण या प्रकरणात देवस्थान समितीची जी बदनामी झाली, त्याचे काय असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा कथित व्यापारी नेता व ही चांदी जवळच ठेवणारे एक विश्वस्त शालिग्राम तिबडीवाल यांची संस्थेतून हाकालपट्टी करण्याची भूमिका पुढे आली. केवळ अध्यक्ष मोहन अग्रवाल यांनी तिबडीवाल यांची पाठराखण केली. मात्र उर्वरित विश्वस्त एकत्र आले व त्यांनी ठराव मंजूर केला, अशी माहिती हिवरे यांनी दिली. बहुमताने घेतलेला ठराव मान्य होतो, असे ते म्हणाले. डॉ. निकम यांनी, चांदी परत मिळाली, हे महत्त्वाचे. या ठरावाची प्रत धर्मादाय आयुक्त कार्यालयास पाठवली जाईल, असे सांगत ‘लोकसत्ता’चे आभार मानले.