वर्धा: शालेय जीवनात सुट्टी असणे किंवा ती मिळण्याचा आनंद अवर्णनीय असल्याचा सर्वत्रिक अनुभव सांगितल्या जातो. त्यातूनच, सांग सांग भोलानाथ, सुट्टी मिळेल काय, अशी गाणी जन्मास आली. आता विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक वर्गास पण सुट्टी तेवढीच प्रिय असल्याचे म्हटल्या जाते. पण विशेष व खबरदारी म्हणून शिक्षकवर्ग सुट्टीची अपेक्षा ठेवत असतील तर त्यात वावगे नाही. झाले असे की १९ व २० जुलै रोजी वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा ईशारा देण्यात आला आहे. त्यादृष्टीने सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जारी केले. धोक्याचा ईशारा देण्यात आला आहे. पर्यटन स्थळावार गर्दी करू नये, घराबाहेर पडू नये तसेच बहुतांश जलशयात ५० टक्क्यावर साठा असल्याने पाणलोट क्षेत्रात पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

मात्र शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला.जिल्ह्यातील अनेक गावे नदीकाठी आहेत. शालेय विद्यार्थी अन्य गावातून पायपीट करीत किंवा मिळेल त्या वाहनाने येतात.अनेक गावात ओढे, नाले ओलांडून शाळेत यावे लागते. लहान गावातील शाळांच्या इमारती मोडकलीस आल्या आहेत.अनेक शाळांचे छप्पर गळते. काही शाळा परिसरात पाणी तुंबत असल्याने तलावच तयार होतो. वीज पडण्याचे प्रकार व शाळा वास्तूतील मोडकी विद्युत यंत्रणा अश्या बाबी धोकादायक ठरतात. असे राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निदर्शनास आणले. विद्यार्थ्यांची सुरक्षा म्हणून सुट्टी जाहीर करण्याची विनंती या संघटनेने केली. पण संबंधित शिक्षणाधिकारी सुट्टीवर असल्याने हालचाल झाली नसल्याचे शिक्षक नेते विजय कोंबे यांनी स्पष्ट केले. मात्र याविषयी लोकसत्ताने विचारणा केल्यानंतर आता आदेश आला आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढून सुट्टी जाहीर केली आहे. मात्र समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलू या पाचच तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील शाळांना हा सुट्टीचा आदेश लागू होणार नाही. ज्या शाळा आज सकाळच्या सत्रात सूरू झाल्यात त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी पाऊस कमी होई पर्यंत शाळेतून मुलांना घरी जाऊ देवू नये, असेही प्रशासनाने खबरदार केले.

हेही वाचा : अखेर परदेशी शिष्यवृत्तीच्या जाचक अटी सरकारने मागे घेतल्या, पूर्ण शिष्यवृत्ती मिळणार तर गुणांची अट…

मात्र आज सुट्टी जाहीर होण्यापूर्वी शिक्षक शाळेत पोहचले. त्याची नोंद घेत संघटनेने या शिक्षकांनाच विनंती करून टाकली. शाळेत हजर असतांना दुर्दैवी घटना घडू नये म्हणून दक्षता घ्यावी. सुट्टीचा प्रस्ताव विचारार्थ असल्याने सुज्ञ् शिक्षकांनीच सतर्क असावे, अशी विनंती करण्यात आली हाती, असे कोंबे म्हणाले.