वर्धा व सेलू काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी शेखर शेंडे गटाचे सुरेश ठाकरे व रज्जन मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. तब्बल वीस वर्षांपासून शेंडे गटाला यापासून वंचित ठेवणाऱ्या आमदार रणजित कांबळे गटास हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.पाच वेळा वर्धा नगर परिषदेचे सदस्य व एकदा उपाध्यक्ष राहिलेले सुरेश ठाकरे यांना कांबळे गटाचे सुधीर पांगुळ यांना हटवून शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष करण्यात आले, तर सेलू तालुका काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी मिश्रा यांची नेमणूक प्रदेश समितीने केली आहे.
हेही वाचा >>>गोंदिया : शाळेच्या शौचालयात आढळले जिवंत अर्भक ; पालकांचा शोध सुरू
वर्धा विधानसभा मतदारसंघात शेंडे गटास तिकीट मिळते, मात्र संघटनेत प्रभा राव गटाचे वर्चस्व असते. काही काळ दत्ता मेघे यांनी या दोन्ही समित्या राव गटाकडून हिसकावून घेतल्या होत्या. परत कांबळे गटाची नेतेमंडळी आली. यावेळी शेखर शेंडे यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला. पक्षाची तिकीट देता, मात्र पदे व इतर सर्व विरोधी गटास मिळते. त्यामुळे पक्षाचे काम करणे कठीण झाले आहे. माझ्या गटास डावलल्या जात असेल तर यापुढे पक्ष कार्याची अपेक्षा करू नका, अशी टोकाची भूमिका शेंडे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मांडली होती. यामुळे या दोन नियुक्त्या बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. अशातच दोन दिवसांपूर्वी शेंडे यांनी प्रदेश समितीकडे नियुक्ती पत्र त्वरित देण्याची मागणी केली. अखेर ठाकरे व मिश्रा यांना व्यक्तिगत पत्र मिळाले.
हेही वाचा >>>कसा असणार नागपुरातील दुसरा केबल स्टेटेड पुल ?
याबाबत शेंडे गटाचे प्रवीण हिवरे म्हणाले, प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या झाल्या आहेत. वर्धा मतदारसंघात पक्षातील विरोधकांचा हस्तक्षेप श्रेष्ठींनी अमान्य करीत शेंडे गटास न्याय दिला, त्याचे आम्ही स्वागत करतो.