वर्धा : लोकसभेवर निवडून गेल्यानंतर नवनिर्वाचित व प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना हवे असते नवी दिल्लीत हक्काचे घर. नवे प्रशस्त फ्लॅट नव्या खासदारांना दिल्या जातात, अशी माहिती आहे. ज्येष्ठतेनुसार निवास वाटल्या जाते. पण कसेही असो दिल्लीत निवास केव्हा मिळणार, अशी प्रतिक्षा या नव्या खासदारांना लागून राहिली असल्याचे सांगितल्या जाते. तुर्तास निवास वाटप न झाल्यामुळे या नव्या खासदारांचे सध्या महाराष्ट्र सदनात वास्तव्य आहे.
महाराष्ट्र सदनात सध्या गर्दीच असल्याचे ऐकायला मिळते. खासदार अमर काळे यांचेही वास्तव्य महाराष्ट्र सदनातच आहे. त्यांना स्वतःचे घर मिळाले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमर काळे यांना दिल्लीत अन्य एक निवास सुचवून तिथे राहण्याची ऑफर दिली. हे पवार यांचे घर निवासास उत्तम असे. मात्र, खासदार अमर काळे यांनी विनम्रपणे ही ऑफर नाकारली. ते म्हणाले की, अशी ऑफर एक सोय म्हणून पवारांनी दिली. पण आपण ती नाकारली. काही ठोस कारण नकार देण्यामागे नाही. मात्र मी सध्या महाराष्ट्र सदन येथेच थांबलो आहे. लोकसभेच्या आवास समितीचे अद्याप गठन झालेले नाही. त्यामुळे नव्या खासदारांना किमान दोन महिने प्रतीक्षाच करावी लागेल, असे उत्तर अमर काळे यांनी दिले.
खासदार अमर काळे यांनाच शरद पवार यांनी निवासाची ऑफर का दिली, असा प्रश्न पडू शकतो. तर त्यामागे कौटुंबिक स्नेहाचा धागा आहेच. अमर काळे यांचे सासरे अशोक शिंदे यांचा पवार कुटुंबाशी घरोबा आहे. १४ वर्षे केंद्रात कृषिमंत्री राहलेले अण्णासाहेब शिंदे यांचे अशोक शिंदे हे सुपुत्र होत. म्हणजे ४० वर्षांपासून शिंदे – पवार कुटुंबाचा घरोबा आहे. अण्णासाहेब शिंदे प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून पवार हेच जबाबदारी सांभाळतात. अमर काळे यांच्या अर्धांगिनी मयुरा काळे या पवार कुटुंबात घरची मुलगी म्हणून वावरतात. त्या स्वतः म्हणतात की आजोबांच्या काळापासून हा घरोबा राहला आहे. शिंदे प्रतिष्ठानने मदत निधी देताना मयुरा काळे यांच्या आर्वीतील बचत गट समूहास सहर्ष सहाय्य केले होते, असाही दाखला दिल्या जातो. असा घट्ट स्नेह असल्याने शरद पवार व अमर काळे यांचे नाते सासरे – जावयाचे आहे. कदाचित याच आपुलकीतून पवार यांनी खासदार काळे यांना दिल्लीत तात्पुरते म्हणून स्वतःचे घर ऑफर केले असणार.
हेही वाचा – माजी मंत्री सुनील केदार विधानसभा लढवू शकणार नाही, उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार
लोकसभा निवडणुकीच्या काळात कट्टर काँग्रेसी असणाऱ्या अमर काळे यांना स्वपक्षात घेऊन शरद पवार यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात तुतारी चिन्हवार उभे केले. काळे खासदार झाले. तेच विदर्भात पवार यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत. निवडणूक काळात काळे हे बरेचदा सहकुटुंबच पवारांना भेटायला जात.