वर्धा : वर्धा पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव पाहून शहरात खळबळ उडाली आहे. आज एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीतर्फे निवडणूक कार्यक्रम न्यू इंग्लिश शाळेच्या पटांगणात सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्या चर्चेत भाजप नेते श्रीधर देशमुख यांनी काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांच्यावर टीका केली. शेंडे यांचे आजोबा अनेक वर्ष आमदार, वडील ३० वर्ष आमदार व काही काळ मंत्री, आता पुत्र शेखर यांना सतत पडूनही परत चौथ्यांदा तिकीट दिले. ही घराणेशाही जनता खपवून घेणार नाही, असे भाष्य केले.
मात्र, कार्यक्रम आटोपल्यावर शेखर शेंडे यांचे बंधू रवी शेंडे व त्यांचे मित्र बबलू बिर्याणीवाला हे माझ्यावर धावून गेले व मारहाण केली, असे श्रीधर देशमुख यांनी नमूद केले. मला मारहाण होत असल्याचे पाहून पत्नी व माजी नगरसेवक श्रेया देशमुख मधात पडली. तेव्हा तिला पण या लोकांनी धक्काबुक्की केली, असा आरोप श्रीधर देशमुख यांनी केला. सध्या मी व पत्नी श्रेया तक्रार देत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा – “बंडखोरी नव्हे हा तर उठाव,” ब्रिजभूषण पाझारे २४ तासांनंतर अवतरले अन्…
उमेदवार शेखर शेंडे म्हणाले, मी एका गावात प्रचार कार्यात आहे. हा भाजपचा आम्हास बदनाम करण्याचा डाव आहे. आता ते रविदादावरसुद्धा गलिच्छ आरोप करत असतील तर मग जनता ठरवेल. हा प्रकार कळताच आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष गफाट व अन्य भाजप नेते वर्धा पोलीस ठाण्यात पोहोचले. आमदार भोयर म्हणाले, हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून विरोधक काय स्तर गाठत आहे हे यातून दिसून येते. श्रीधर देशमुख हे एका विकाराने त्रस्त असताना त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे पातळी सोडून वागणे नव्हे का, असा प्रश्न भोयर यांनी केला.
हेही वाचा – माजी आमदार राजू पारवेंचे पक्षबदल, लोकसभेत शिवसेनेत, विधानसभेत भाजपमध्ये!
‘बनावट आरोप, भाजपचे षडयंत्र’
रवी शेंडे म्हणाले, हा खोटा आरोप आहे. त्यांनी माझ्या कुटुंबावार आरोप केले. त्यामुळे मी व्यथित होऊन आजोबा व वडिलांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. त्यानंतर निघून गेलो. पुढे काय झाले ते मला माहीत नाही. आरोप होत असल्याने मीसुद्धा पोलीस तक्रार केली आहे. या बनावट आरोपाची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी. हे भाजपने रचलेले षडयंत्र आहे, असे शेंडे म्हणाले.