वर्धा : विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ व अन्य वरिष्ठांना थेट घटनास्थळी दाखल व्हावे लागले. तडकाफडकी सूत्रे फिरली. दोन शिपाई निलंबित तर ठाणेदाराची तत्काळ बदली झाली. अवघ्या १६ तासात या हालचाली झाल्या. प्रकरण आहे आर्वीचे. येथील अजय यशवंत कदम यांची बँकेकडे गहाण मालमत्ता लिलावात निघाली. ती विकत घेणाऱ्याने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कदम कुटुंबीयांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. ते पाेलिसांकडे गेले मात्र दखल घेतली गेली नाही. आमदार सुमित वानखेडे यांनी हस्तक्षेप केला. आणि पोलीस यंत्रणा गतीने कामाला लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कदम यांची आर्वीतील वसंत नगरातील मालमत्ता राकेश खत्री, दिपक मोटवानी व करण मोटवानी या तिघांनी १ कोटी ५६ लाख रुपयांत विकत घेतली. २३ जानेवारीला खरेदी व ताबा देण्यात आला. खरेदीदार मालमत्ता असलेल्या ठिकाणी कॅमेरे लावण्यास गेले असताना वाद व मारहाण झाली. अजय कदम, बाजीराव निस्ताने, राम निस्ताने, सुनीला कदम, नमिता कदम यांनी पोलिसांकडे २५ जानेवारीला मोटवानी विरोधात तक्रार दाखल केली. त्यात आम्ही घरी असताना आरोपी जबरीने घरात घुसल्याचा आरोप आहे. त्यांनी अधिकार नसताना कुलूप लावण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला. हे कृत्य करण्यास मनाई केल्यावर मोटवानी हे आमच्यावर धावून आले. तसेच पत्नी व सूनेला धक्काबुक्की केली, अशी अजय कदम यांची तक्रार आहे.

आमच्या मिळकतीचा न्यायालयात वाद सुरू असून सद्या राहत असलेले घर व कार्यालय याचा कुठलाही वाद न्यायालयात नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. २५ तारखेला ही तक्रार दाखल झाली. मात्र त्याची कसलीच दखल आर्वी पोलिसांनी घेतली नाही. परत तक्रार करण्यात आल्यावरही दखल न झाल्याने कदम कुटुंबाने आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे दाद मागितली. सूत्रे वेगाने फिरायला मग सुरुवात झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, पोलीस अधीक्षक अनुराग जैन हे सोमवारी सायंकाळी आर्वीत पोहोचले. चौकशी सुरू केली. हा मालमत्ताविषयक वाद असल्याने ती बाब बाजूला ठेवून कदम कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीची विचारपूस झाली. आज परत या तक्रारीची शहानिशा झाली. अखेर कर्तव्यात हलगर्जीपणा म्हणून आर्वी शहर पोलीसदलातील एक हवालदार व एक शिपाई निलंबित करण्यात आले. तसेच ठाणेदार यशवंत सोळसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांना वर्धा मुख्यालयात पाठविण्यात आले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी यास दुजोरा दिला. आरोपी दिपक मोटवानी सध्या फरार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha sp and mla sumit wankhade took note of beating of family in property dispute complaint in arvi pmd 64 ssb