वर्धा : फोटोग्राफर संघटनेचे क्रिकेट सामने नुकतेच आयोजीत करण्यात आले होते. त्यास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित एसपी हसन यांना पहिला चेंडू खेळण्याची विनंती करण्यात आली. ती सहर्ष स्वीकारत त्यांनी बॅट पकडली आणि बॉलर थकेपर्यंत सोडलीच नाही. पहिल्याच चेंडूवर भल्या मोठ्या सर्कस ग्राउंडवर त्यांनी षटकार ठोकला. आता ते बॅट सोडतील म्हणून आयोजक त्यांच्याकडे गेले. तेव्हा ते वदले की अरे मी पक्का बॅट्समन आहे, करा न बोलिंग. मग सलग अर्धा तास त्यांची धुवाधार बॅटिंग उपस्थित क्रिकेट प्रेमींना मोहात पाडून गेली.
हेही वाचा : महाराष्ट्र- मध्यप्रदेश दरम्यान ८ ऑक्टोबरपासून आणखी रेल्वेगाडी
रन मोजायची गरजच पडली नाही. प्रखर उन्हात घाम गाळून हसन जेव्हा मंडपात पोहोचले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. आयोजक गांधी जिल्हा फोटोग्राफर संघटनेचे उपाध्यक्ष राहूल तेलरांधे म्हणाले की हसन सरांनी क्रिकेटचा आनंद घेतला व दिला. आम्ही या क्षणाचे भरपूर फोटो टिपले, असे अनेक उपक्रम संघटना राबवित असते. या प्रसंगी नाट्यकर्मी हरीश इथापे, माजी पालिका उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, माजी नगरसेविका वंदना भुते प्रामुख्याने उपस्थित होते.