वर्धा : ग्रामीण भागात शिकणाऱ्या चिमूरड्या अर्णवने मुष्ठीयुध्द स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्णभरारी घेतली असून आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अर्णव जयराज नाथजोगी हा तपस्या स्कूलमध्ये सहाव्या वर्गात शिकतो. मात्र त्याचे नाव थाय बॉक्सिंग क्रिडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर चमकले आहे. तेलंगणा येथे संपन्न राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत त्याला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या हस्ते पदक स्वीकारून तो गावी परतला आहे. थाय बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक प्राप्त करत भारताचे नाव उंचावले होते. आता अर्णवची वाटचाल त्यादिशेने सुरू आहे. त्याला लहानपणापासून या खेळाची आवड असल्याचे त्याचे वडील जयराज नाथजोगी सांगतात. अशी आवड असल्याने त्याला आर्वीतीलच मोहम्मद सलीम यांच्याकडे सरावासाठी पाठविले. कराटेत तो निष्णात झाला. त्यानंतर थाय बॉक्सिंगकडे वळला. तरबेज झाल्यावर त्याने सर्वप्रथम जिल्हा स्पर्धा जिंकली. यानंतर नगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अर्णवने रजतपदक प्राप्त केले. त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. येथून तो सुवर्णपदक जिंकूनच घरी आला.

हेही वाचा : वाशीम: वीज पडून महिलेचा मृत्यू, चार जनावरेही दगावली

आता त्याची निवड काठमांडू येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली आहे. येथेही तो विजेता ठरेल, असा विश्वास वडील जयराज व आई ॲड. प्रेरणा नाथजोगी यांना आहे. वडील दिवसभर शिक्षक म्हणून लगतच्या खेड्यातील शाळेत व्यस्त तर आई न्यायालयात वकिली करीत असूनही अर्णवचे अभ्यासातील लक्ष तसूभरही कमी झाले नाही. वर्गात त्याचा पहिला क्रमांक चूकला नाही. तसेच वक्तृत्व स्पर्धेतही तो अव्वल असल्याचे कुटुंबाचे स्नेही अविनाश टाके सांगतात. तर अर्णव म्हणतो की बॉक्सिंग ही माझी आवड असून त्यात नाव कमविण्याचे ध्येय ठेवले आहे.