वर्धा : पवित्र पोर्टलवर ५ फेब्रुवारीस प्रसिद्ध शिक्षक भरतीच्या जाहिरातीत पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देणे अपेक्षित आहे. मात्र त्यानुसार प्राधान्यक्रम उपलब्ध झाले अथवा नाही याची खात्री करण्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध झाले नाही त्यांची निवेदने मेलवर प्राप्त झालीत. त्याची पडताळणी केल्यावर उमेदवा्रांकडून आवश्यक माहितीची अचूक नोंद स्वप्रमाणपत्रात न केल्याने त्यांना योग्य ते प्राधान्यक्रम उपलब्ध झाले नसल्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले.
तसेच काही पात्र उमेदवारांना तांत्रिक कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध झाले नाहीत. या अडचणी दूर करण्यात आल्या असून प्राधान्यक्रम प्राप्त होत आहे. आता अश्या पात्र उमेदवारांनी त्यांना पूर्वी प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने द्यायचे आहेत.त्यानंतरच त्यांना पात्रतेप्रमाणे मिळतील.काही बीएससी पदवीप्राप्त उमेदवारांनी त्यांच्या पदवीचे विषय केमिस्ट्री असे न लिहता ऑरगॅनिक केमिस्त्री, इनऑरगॅनिक केमिस्ट्री असे असे लिहले.तर काही पदव्युत्तर पदवी असलेल्यांनी बायलोजि लिहले. झुलोजी किंवा बायलॉजी अशी नोंद केलेली नाही. अन्य शाखेत पण असे प्रकार झालेत.एम कॉम पदव्युत्तर पदवीप्राप्त उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीचे विषय बँकिंग,इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट असे दाखविले होते.त्यामुळे त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध झाले नव्हते. त्यांना आता आवश्यक ते प्राधान्यक्रम विषयानुसार मिळू लागले आहे. काही उमेदवारांना नववी ते बारावीच्या खाजगी व्यवस्थापनाचे प्राधान्यक्रम वयोमर्यादेच्या कारणास्तव उपलब्ध झाले नसल्याची अडचण आहे. ती लवकरच दूर करण्याची खात्री देण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘या’ भागांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’
उपरोक्त अडचणीचे निराकरण होत असून समस्यांना योग्य उत्तरे दिल्या जात असल्याची ग्वाही शिक्षण खात्याने दिली आहे.मात्र असंख्य प्रमाणात ई मेलवर शंका उपस्थित झाल्याने उत्तर प्राप्त होण्यासाठी उमेदवारांनी प्रतिक्षा करावी, असे आवाहन आहे. या भरतीबाबत विविध पातळीवर गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून येते. हे पाहून खात्याने कार्यालयात गर्दी न करण्याचे सुचविले. केवळ मेलद्वारे शंका उपस्थित करावी.त्याचे शंकनिरसन होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या भरती साठी अनेक वर्षांपासून पात्र उमेदवार प्रतीक्षेत होते. आता संधी उपलब्ध झाली असल्याने एकच झुंबड उडत आहे.