वर्धा : उष्माघाताचा प्रभाव कमी करण्यासाठी विद्यार्थ्याना थंडपेय देण्याची सूचना शासनाने केल्यावर पोषण आहाराचेच पैसे नाही तर थंड पेयासाठी पैसे आणायचे कुठून, या पेचात राज्यातील शिक्षकवर्ग पडला आहे.महसुल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुचनावजा दिलेल्या मार्गदर्शन पत्राने शिक्षकांना पेज पडला आहे. केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या पत्राचा संदर्भ देत हे मार्गदर्शन झाले आहे. उष्णतेच्या लाटांमूळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणुन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश आहेत. विविध विभागांना सुचित करण्यात आले आहेत.
शिक्षण विभागास पण सुचना आहेत. हवामान खात्याच्या ईशाऱ्यानुसार शाळेच्या वेळेचे नियोजन करावे. वर्गखोल्या थंड असाव्या आणि प्रथमोपचार तसेच पेयजलाची सोय करावी. शाळेच्या वेळेत बदल करावा. परिस्थितीनुसार सुट्टी द्यावी. मैदानात वर्ग घेउ नये. दुपारच्या सत्रात खेळांचे आयोजन नको. सकाळच्या सत्रातच परिक्षा घेतल्या जाव्यात. पंखे सुरू राहण्याची खात्री करावी. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मुलांना सरबत, ताक तसेच ओआरएसचे पॅकेट द्यावे, अश्या सूचना आहे.
मात्र उन्हाळ्याची ही विशेष व्यवस्था करायची कुठून, असा प्रश्न मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे. वर्गखोल्या थंड करण्यासाठी कुलर लावावे लागतील. असंख्य शाळांमध्ये साधे पंखेपण नाहीत. खोल्या तापलेल्याच असतात. शाळेची वेळ सकाळची ठेवली तरी उन सकाळपासुनच तापलेले असते. खेड्यातील आईवडिल सकाळीच कामाला जातात. म्हणुन विद्यार्थीवर्ग उपाशीपाेटीच शाळेत येतात. म्हणुन त्यांना किमान पोषण आहार देण्याची खबरदारी शिक्षकांना घ्यावीच लागते. आहारासाठी येणारे अनुदान कधीच वेळेवर मिळत नाही. शिक्षकच जवळचे पैसे टाकुन आहाराची व्यवस्था करतात. आता थंड पदार्थ देण्याची सुचना आली. त्यासाठी पैसे कोण माेजणार, हे स्पष्ट नाही. म्हणुन शिक्षकांनाच ती सोय करणे अपेक्षीत ठरते. कोणकोणत्या जबाबदाऱ्या शिक्षकांनी पार पाडायच्या, असा सवाल शिक्षक वर्तुळातून पुढे येतो.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय काेंबे म्हणतात की अद्याप फेब्रुवारी, मार्च या दाेन महिन्याचा किराणा व धान्य पुरवठा झालेला नाही. घरून उपाशीच येणारा विद्यार्थी रिकाम्यापाेटी राहू नये, म्हणून शिक्षकच काळजी घेतात. पदरमोड करीत तर कधी उसनवार करीत शाळेत पोषण आहार शिजवित आहे. आता दुसरीकडे परत थंड पेय देण्याची सूचना आली. ती कशी अंमलात आणायची, असा पेच आहे.