वर्धा : देशाचे पंतप्रधान मोदी यांचा लोकसभेचा मतदारसंघ म्हणून वाराणसी या शहराची नवी ओळख आहे. दोन वेळा ते येथून विजयी झाले असून आता यावेळी ते सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बोलल्या जाते. त्यांच्या विरोधात येथील बॅंक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी अवचितराव सयाम हे लढण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यांनी शुक्रवारी वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांनी स्वतःच स्थापन केलेल्या जनसेवा गोंडवाना पार्टीतर्फे ते लढणार आहे. येथे अर्ज सादर करणे खूप अवघड असे काम असल्याचा अनुभव आल्याचे त्यांनी वाराणसी येथून बोलताना सांगितले.
सुरक्षेचे कारण देत पदोपदी अडथळे निर्माण केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मोबाईल नेऊ दिल्या जात नाही. फोटो काढू दिल्या जात नाही. अर्ज प्रतिनिधीस देत नाही. लढण्यास इच्छुक व्यक्तीस स्वतः रांगेत लागून अर्ज न्यावा लागतो. येथून निवडणुकीसाठी उभे राहण्यास देशभरातून उमेदवार येत आहे. दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथून पन्नास व्यक्ती अर्ज भरण्यास आल्या होत्या. प्रत्येक दिवशी किमान शंभर व्यक्ती अर्ज घेण्यास येतात. काही एजेंट सक्रिय झाले आहे. ते विरोधातील अर्ज फाडून टाकत असल्याचे पाहायला मिळाले. व्होटर लिस्टची सत्य प्रत मिळण्यासाठी बँकेत तेरा रुपयाचे चालान भरावे लागते. बँकेत खाते उघडण्यास एक आठवडा लागतो. आता मोदी हे सोमवारी अर्ज भरणार म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आलं आहे, अशी स्थिती सयाम यांनी सांगितली.
हेही वाचा – राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या प्रतिष्ठित जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड
हेही वाचा – बुलढाणा : ‘राजा कायम’, पीकपाणी साधारण! भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष
पण ही राजवट बदलण्यासाठी आपण मोदींविरोधात लढण्याचा मानस ठेवल्याचे ते सांगतात. सयाम हे वर्ध्यात बॅंक कर्मचारी संघटनेचे नेते म्हणून ओळखल्या जात होते. तसेच आदिवासी बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यात ते पुढे असतात. बँकेत नोकरी करीत असतानाच लोकांच्या अनेक समस्या असल्याचे लक्षात आले. पण कामात प्रामाणिक राहून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. निवृत्तीनंतर स्वस्थ बसने शक्य नव्हते. म्हणून सक्रिय राजकारण करण्याचा निर्धार केला. यावेळी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून लढलो आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून अर्ज सादर केला. त्रुटी निघणार नाही, अशी खात्री आहे. मात्र निघाल्यास त्या दूर करीत सज्ज होणार असा विश्वास सयाम व्यक्त करतात.