वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथील पुलावरून प्रवास करीत असताना पाण्याच्या प्रवाहाने दुचाकी वाहनावरून प्रवास करणारे दोघे नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू असताना लालनाला प्रकल्पात आज त्या दोघांसोबत आणखी एकाचा मृतदेह आढळून आला. तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. दोघांची ओळख पटली असून तिसऱ्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुलतानपूर वेथील सूरज बंडू भगत व रोशन गजानन भगत हे एम एमएच २९ एपी १३७६ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने २३ सप्टेंबर रोजी कोरा परिसरातील मंगरूळ येथील पुलावरून प्रवास करीत असताना पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले होते. या घटनेची तक्रार गिरड व हिंगणघाट पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. तक्रार प्राप्त झाल्यापासून या दोघांचा शोध सुरू करण्यात आला होता. त्याकरिता गृहरक्षक दलाच्या जवानांवर जबाबदारी देण्यात आली होती. लालनाला प्रकल्पात पाहणी केली असता बुधवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान पुरुषांचे मृतदेह अथांग पाण्यात आढळून आले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेव्हा स्थानिक मच्छीमारांची दोन नावे मृतदेह काढण्यासाठी पाठविण्यात आली. पण त्यांना ते शक्य झाले नाही. घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला देण्यात आली व त्यांच्या चमूची मदत मागविल्या गेली. ती चमू घटनास्थळावर आल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्याच्या कार्याला गती आली.
हेही वाचा – ऑनलाईन शेअर्स खरेदी : चंद्रपूरच्या उच्चशिक्षित महिलेची ७४.५० लाखांनी फसवणूक
सुरुवातीला पाण्यात दोन मृतदेह असल्याचे सांगण्यात येत होते. नंतर तीन मृतदेह असल्याची माहिती आली. घटनास्थळावर हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी हे त्यांच्या कर्मचारी चमूसह उपस्थित होते. परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेतमाली, गिरड येथील ठाणेदार संदीप गार्ड उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन चमू, गिरड पोलीस ठाण्यातील कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान व स्थानिक मच्छीमारांच्या प्रयत्नानंतर तीनही मृतदेह पाण्याबाहेर आणण्यात आले.
हेही वाचा – धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
मृतकांच्या नातलगांना घटनास्थळी बोलविण्यात आले होते. त्यांनी सूरज बंडू भगत व रोशन गजानन भगत या दोघांची ओळख पटविली. तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटविता आली नाही. लालनाला प्रकल्पामध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील गावांमधील नागरिकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तीनही मृतदेह पाण्यात असल्याने पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाले होते. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांची पळापळ सुरू होती. तिसरा मृतक कोण आहे, त्याचा खुलासा झालेला नसून प्राथमिक तपासानंतर तीनही मृतदेह समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीता नेण्यात आले आहे.