वर्धा: जंगल भागातून बेपत्ता झालेला तीन वर्षीय कार्तिक हा बालक कुठाय, हे अद्याप अज्ञात. १२ मार्च पासून त्याच्यासाठी शोधाशोध सूरू. अंधश्रद्धा हा पैलू तपासात. पोलीस व वन खात्याची चमू जंगलात फिरतेय. पण काही रक्ताचे डाग वगळता काहीच नामोनिशान नाही. सर्वच हतबल. आता तर हे असे रहस्य सगळ्यांना हतबल करणारे ठरू लागले आहे. कार्तिक कुठाय, याच्या शोधात सगळेच गर्भगळीत.
बाळ कार्तिक हा एअरसिंग चहल यांचा सहापैकी एक मुलगा. होळीच्या आदल्या दिवशी घरून बाहेर पडला. आई व वडील जंगलात मजुरीवर गेलेले. आई घरी परतली तेव्हा कार्तिक दिसत नाही म्हणून इतर भावंडास विचारणा करीत शोध सूरू केला. गावकरी शोधात. काहीच मागमूस लागत नाही म्हणून मग पोलीस तक्रार. शेवटी पोलीस, गावकरी, वन खाते यांची २५ किलोमीटरच्या जंगल परिसरात पायपीट. पण कुठेच काही दिसत नाही म्हणून वन खात्याने ट्रॅप कॅमेरे लावले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या दोन्ही संघटना कार्तिक घरी व परिसरात फिरल्या. अंधश्रद्धा विषयक अघोरी कृत्य तर नाही नां, अशी चौकशी झाली. पण कसले काहीच हाती लागलेले नाही.
आमदार सुमित वानखेडे म्हणतात, मी स्वतः या प्रकरणी पाठपुरावा करीत आहे. आर्वी पोलीस योग्य तपास करीत आहे. जेव्हा मला तपासात दम वाटणार नाही तेव्हा योग्य वरिष्ठ पातळीवर मी प्रकरण मांडणार. आज तरी कसून तपास सूरू असल्याची माझी खात्री आहे. महाराष्ट्र अनिसचे गजेंद्र सुरकार म्हणाले, हे प्रकरण रहस्यमय ठरत आहे. एका भागात रक्ताचे थेंब दिसून आले. त्याची प्रयोगशाळेत तपासणी सूरू आहे. पण वन्य जीवाकडून भक्ष्य झाल्याचे चिन्ह दिसत नाही. भारतीय अनिसचे पंकज वंजारे हे आपल्या चमूसह घटनास्थळी जाऊन आलेत. ते म्हणतात की रक्त अहवाल आल्यावर प्रकाश पडू शकतो. याखेरीज आर्वी परिसरातील भाजप कार्यकर्ते या बेपत्ता प्रकरणात काही माहिती मिळतेय कां, याची विचारपूस करीत आहे.
पोलीस अधीक्षक अनुराग जैन म्हणाले, सायबर टीम व स्थानिक पोलीस तपास करीत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी मागोवा घेत आहे. मी स्वतः कार्तिकच्या परिवारास भेटून आलो. परिसर तपासणी स्वतः केली. येथील जंगल भागातील झालेली तपासणी अद्याप निर्णयक म्हणता येणार नसली तरी मी रोज लक्ष ठेवून आहे. कार्तिकचा परिवार हा आर्वी तळेगाव रस्त्यालगत मांडला या गावाभोवती असलेल्या जंगलात निवासी आहे. टेकडी व कालवा या मधात असलेल्या वनराजीत अशी केवळ चार पाच कुटुंबे आहेत. शेती मक्त्याने घेऊन तसेच मजुरी करीत ते उदरनिर्वाह करतात. कार्तिकचे बेपत्ता होणे हे आश्चर्यकारक ठरत आहे. या आर्वी परिसरात जादूटोना विषयक उपयुक्त मानल्या जाणाऱ्या प्राण्यांची तस्करी झाल्याचे प्रकारण उघडकीस येऊन चुकले आहे. पण तशी शंका सध्या घेता येत नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन संघटना सांगतात. पण प्रकरण रहस्यमय ठरत चालल्याने सर्व त्या तऱ्हेने शोध सूरू आहे. हाती काहीच नं लागल्याने मोबाईल डाटा तपासणे सूरू आहे. हा परिसर हायवे लगत येतो. म्हणून परिसर व मार्गावरील बसेस व अन्य वाहतूक यातील प्रवासी व त्यांचे मोबाईल लोकेशन तपासात असल्याचे समजते. ही मोबाईल संख्या लाखोच्या घरात जाते. पण पोलीस यंत्रणा कार्तिकचा तपास एक आव्हान समजून कामाला लागल्याचे चित्र दिसून येते.