वर्धा : जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नदी, नाले, जलाशये ओसंडून वाहू लागत आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचा व धोक्याची ठिकाणे टाळण्याचा इशाराही दिला. तरीही दुर्घटना घडत आहेत. आज दुपारी पुलगाव येथील पुराच्या पाण्यात दोघे वाहून गेले असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. एक महिला व एक पुरुष, असे दोघे दुचाकीद्वारे पुलगाव येथून निघाले होते. पुलावर आले असतानाच त्यांची दुचाकी पाण्याच्या प्रवाहात घसरत गेली व शेवटी महाकाय पात्रात वाहून गेली, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथक रवाना झाली.

वाहून गेलेल्या स्त्री-पुरुषाची ओळख पण पटलेली नाही. केवळ लाल रंगाची स्कुटी असल्याचे सांगितल्या जाते. त्यांचा शोध घेण्यासाठी अद्याप पोलीस किंवा प्रशासनाकडे कोणीच आले नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खटाले म्हणाले. सायंकाळी अंधार पडल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे. उद्या सकाळी परत नागपुरातून विशेष पथक आल्यानंतर शोध घेतला जाणार आहे.

हेही वाचा – बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू! पोळा सणावर शोकाचे सावट

शनिवारी रात्री आजोबा व नात हे पुरात वाहून गेले होते. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ४८ तास उलटूनही शोध न लागल्याने बचाव पथक उद्या सकाळी परत शोध घेणे सुरू करतील. हिंगणघाट तालुक्यात चाणकी या गावी ही घटना घडली होती. कानगाव येथील बाजार आटोपून लाला सुखदेव सुरपाम तसेच त्यांची नऊ वर्षीय नात नायरा साठोणे हे दोघे गावी चाणकीसाठी परत निघाले होते. गावाच्या पुलावरून जात असतानाच पूल खचला. खाली पाडून पुराच्या प्रवाहात ते वाहून गेले. रविवारी सकाळपासून त्यांचा शोध घेणे सुरू झाले. पाण्याचा प्रवाह जलद असल्याने बचाव पथकास नौका पाण्यात टाकणे अवघड झाले होते. पण काही काळाने पथकाने दहा किलोमीटरचा परिसर तपासला. आज सायंकाळी शेवटी शोध मोहीम थांबविण्यात आली. उद्या, मंगळवारी सकाळी परत शोध घेणे सुरू होईल, अशी माहिती तहसीलदार शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा – नागपुरात काँग्रेसचे महायुती सरकारविरूद्ध ‘जोडे मारो’ आंदोलन, आ. ठाकरे म्हणाले “ही तर भाजपची पेशावाई…”

जुलै महिन्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गतवर्षी या महिन्यात ३९७ मिमी पाऊस झाला होता, तर यावर्षी ५५५ मिमीची नोंद होऊन गेली. ऑगस्ट १३० व १७० मिमी अशी अनुक्रमे नोंद आहे. सरासरीपेक्षा २०० टक्के अधिक असा विक्रमी आकडा आहे. पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन,उन्नई, कार, सुकळी ही धरणे १०० टक्के भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Story img Loader