वर्धा : लोकसभा निवडणूक आटोपली. लगेच कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला आघाडी याची आकडेवारी घेत सर्वपक्षीय इच्छुक कामाला लागल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज ठेवत हे संभाव्य उमेदवार चाचपणी करू लागले आहे.
वर्धा विधानसभा क्षेत्रात अमर काळे यांना नऊ हजार मतांची आघाडी लाभली होती. त्यामुळे भाजप गोटात अस्वस्थता तर काँग्रेस नेते आनंदून गेले. आता २०१९ च्या निवडणुकीत चर्चेत आलेले डॉ. सचिन पावडे यांची पूर्ण तयारी असल्याच्या घडामोडी आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपकडे अधिकृत अर्ज केला होता. मुलाखत पण दिली. भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पक्षातील विरोधकांची त्यास फूस असल्याचे लपून राहिले नव्हते. आता मात्र पावडे महाविकास आघाडीकडे तिकीट मागत आहे. आघाडीतील तीनही पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी संपर्क ठेवला आहे. हे पक्ष त्यांना तिकीट देणार याची कसलीच खात्री नसूनही त्यांनी वर्धा मतदारसंघातील ठराविक प्रमुख लोकांशी गाठीभेटी सुरू केल्या. हे कसे अशी विचारणा केल्यावर डॉ. पावडे म्हणाले की मी राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा ठेवून आहे. त्यांनी द्यावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. दिल्यास उत्तम. अन्यथा लोकांचा प्रचंड आग्रह असल्याने अपक्ष उभे राहण्याची तयारी ठेवली आहे, असं गौप्यस्फोट पावडे यांनी लोकसत्तासोबत बोलताना प्रथमच केला.
हेही वाचा – यवतमाळ : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी बहिणींची उसळली गर्दी; ढिसाळ नियोजनामुळे सर्वत्र गोंधळ…
बालरोगतज्ज्ञ म्हणून जिल्ह्यात विख्यात असलेले डॉ. पावडे हे वैद्यकीय मंचच्या माध्यमातून विविध उपक्रम वर्षभर राबवित असतात. पाणी फॉउंडेशन हे त्यांच्या कार्याचे तसेच ऑक्सिजन पार्क येथील वृक्षारोपण हे चळवळीचे प्रतीक समजल्या जाते. या माध्यमातून त्यांनी मोठा गोतावळा उभा केला असून अपक्ष उभे राहण्यास याच संघटना प्रोत्साहित करीत असल्याचे म्हटल्या जाते. तर दुसरीकडे ज्यांच्या उमेदवारीबाबत सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे डॉ. उदय मेघे हे होत. त्यांचेही अद्याप पक्षीय उमेदवारीबाबत ठरले नाही. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे पुतणे असलेले डॉ. उदय हे सावंगी येथील मुख्य अधिकारी आहेत. मेघे कुटुंबाचा वर्धेतील सामाजिक चेहरा ही त्यांची ओळख आहे. गत काही वर्षांपासून त्यांची पावले राजकीय पदार्पण करण्याकडे पडत आहे. ते म्हणतात की उमेदवारी मिळाल्यास लढू. ज्येष्ठ ( दत्ता मेघे व सागर मेघे ) यांचा निर्णय अंतिम राहील.
डॉ. उदय हे स्पष्ट भाष्य करायला तयार नाहीत. मात्र प्रथम भाजप अन्यथा महाविकास आघाडी याकडे त्यांचे पाऊल पडणार. त्यांचे चुलत बंधू समीर मेघे हे आमदार असून परत लढणार हे निश्चित. त्यामुळे एकाच मेघे कुटुंबात भाजप दोन तिकिटा देणार का, असं प्रश्न केल्या जातो. पण मेघेना काहीच अश्यक्य नाही, असाही तर्क राजकीय वर्तुळत असतो. पावडे व मेघे ही दोन नावे चांगलीच चर्चेत आहे. दोघेही सालस, सुसंस्कृत, सेवाभावी व संपर्कशील असल्याचा दाखला दिल्या जातो. पण त्यांची राजकीय महत्वाकांक्षा लपून नाही. म्हणून त्यांच्या प्रतिमेचा उपयोग पक्षाला मिळावा यासाठी राजकीय नेते पण टपून आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांची तिकीट कापण्याची ताकद कोण ठेवतो, याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. आमदार भोयर यांना विरोध करणारे पक्षातील नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.