वर्धा : गावखेड्यात काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी नुसता उच्छाद मांडला आहे. त्यामुळे आता गावाकरीच जागल्याची भूमिका पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. अशाच एका घटनेत एक चोर त्यांच्या हाती लागला. माहिती काढल्यावर तो चक्क निलंबित पोलीस कर्मचारी निघाला.

निमगाव सबाने येथील बाबाराव टेकाम यांच्याकडे चोरी झाली होती. त्यामुळे गावकरी सतर्क झाले होते. त्यांनी बुटीबोरी मेहकर मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिय्या दिला. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा गावकरी दबा धरून बसले. मध्यरात्रीच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती गावात शिरताना दिसला. गावकरी त्याच्यावर पाळत ठेवून होतेच. पण तेवढ्यात एका गावकऱ्याचा मोबाईल खणाणला. त्यामुळे तो अनाहूत व्यक्ती पळू लागला. गावाकऱ्यांनी पाठलाग करीत त्यास पकडले व चांगलेच बुकलून काढले. सोबत असलेले दोघे मात्र पळून गेले. मग गावकऱ्यांनी सावंगी पोलिसांना या घटनेची माहिती फोनवरून दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कपडे हे ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हा तो निलंबित पोलीस कर्मचारी संदीप खरात असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे असलेली एमएच ३३ टी १५८५ ही बोलेरो कार जप्त केली. या वाहनात तीन लोखंडी प्लेट्स व एक पाईप आढळला. प्राथमिक चौकशीत हे लोखंडी साहित्य रेल्वेचे असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – वर्धा : एकतर्फी प्रेमातून युवतीवर कैचीने वार, माथेफिरू युवक…

पोलिसांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिताअंतर्गत गुन्हे दाखल केलेत. तसेच रेल्वे सुरक्षा दलास याची माहिती दिली. आता आरोपी खरात हा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे. निलंबित पोलिसासोबत आणखी दोघे होते. त्यांचीही माहिती मिळाली असून दोघांनाही ताब्यात घेणार असल्याचे सावंगी पोलिसांनी सांगितले. तसेच अन्य काहींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. सदर आरोपीने रेल्वेचे तसेच गावातील आणखी कोणते साहित्य चोरले याचा पण तपास केल्या जात आहे. चोरलेले साहित्य तसेच वाहने कुठे विकल्या जात होते, याची पण माहिती घेतल्या जात आहे. मात्र या घटनेने गाव करी ते राव नं करी या उक्तीचा प्रत्यय आला.

हेही वाचा – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १० पांढऱ्या गिधाडांना युरोपातील ट्रॅकिंग डिव्हाईस!

काही काळापासून जामणी, निमगाव परिसरात सतत सुरू असलेल्या भुरट्या चोऱ्यांनी गावकरी त्रस्त झाले होते. दुचाकी चोरांनी उधम केला होता. सावंगी तसेच देवळी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या पडेगाव, दहेगाव, अडेगाव, आगरगाव, सोनेगाव बाई, चिकणी, निमगाव या गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. शेवटी त्रस्त गावकऱ्यांनी स्वतःच पुढे होय चोरट्याचा बंदोबस्त करण्याचा निर्धार ठेवला. त्यात त्यांना यशही आले.