वर्धा : आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर येणार म्हणून प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. पोलिसांचा कार्यक्रम असल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय सज्ज झाले होते. पण तेवढ्यात संदेश उमटला दौरा रद्द. काय झाले नेमके, तर हवामान आडवे आले.
गडचिरोली लगत फडणवीस मुक्कामी होते. तिथे घनगर्द आभाळ, पावसाचे आगमन व अपुरा प्रकाश यामुळे हेलिकॉप्टर चालकांनी हवामानाचा दाखला देत उपमुख्यमंत्र्यांना उड्डाण शक्य नसल्याचे विनम्रपणे सुचविले. त्याचा तात्काळ स्वीकार करीत उड्डाण प्रवास रद्द करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला.
मात्र थांबणे शक्य नव्हते. म्हणून मोटारीने नागपूरला व नंतर मुंबईस जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुंबई व गोवा बार कौन्सिलचा हीरक महोत्सवी कार्यक्रम मुंबईत असल्याने त्यांनी तडकाफडकी गडचिरोली सोडले. पण इथे वर्धेत मात्र दौरा रद्द झाल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकल्याचे दिसून आले. तर तयारी फसल्याने अनेकांचा हिरमोड झाला.